ताज्या बातम्यारायगड
ग्रामस्थांच्या जलसमाधी आंदोलनाने प्रशासनाची झोप उडाली; 22 जुलैला बैठक, तोपर्यंत अवजड वाहतूक बंद”

पेण : तालुक्यातील दुरशेत गावात अवैध गौण खनिज वाहतुकीमुळे निर्माण झालेल्या जीवघेण्या परिस्थितीचा अखेर ग्रामस्थांनी तीव्र निषेध नोंदवत जलसमाधी आंदोलनाच्या माध्यमातून आवाज उठवला. ग्रामस्थांच्या निर्धारानंतर प्रशासन जागं झालं असून, उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांनी प्रत्यक्ष भेट देत बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून दुरशेत गावातील नागरिक अवजड वाहनांच्या बेफाम व धोकादायक वाहतुकीमुळे सतत धास्तीखाली जीवन जगत आहेत. याबाबत ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार निवेदने व अर्ज सादर करूनही ठोस कारवाई झाली नव्हती. याच पार्श्वभूमीवर मागील महिन्यात दुरशेत फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. त्या वेळी तहसीलदारांनी ग्रामस्थांच्या मागण्या मान्य करत, दगडखान मालकांना स्वतंत्र पर्यायी रस्ता निर्माण करण्याचे आदेश देणारं पत्र काढल्याचे सांगितले होते.
परंतु, महिनाभर उलटून गेला तरी पर्यायी रस्त्याच्या कामास कोणतीही सुरुवात झाली नाही. उलट, स्थानिकांना विश्वासात न घेता बाळगंगा नदी पात्रात प्रदूषक स्लॅगचा भराव टाकण्यास सुरुवात झाली, ज्यामुळे पूरप्रवण दुरशेत गावाला जलमय करण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. प्रशासकीय दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला.
या पार्श्वभूमीवर गावातील युवक उदय गावंड, मिलिंद गावंड, अजय भोईर, जयेश म्हात्रे आणि नितेश डंगर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन छेडले. मोठ्या संख्येने नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलन स्थळी उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांनी भेट देत, येत्या मंगळवारी 22 जुलै रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयात ग्रामस्थांसोबत बैठक घेण्याचे लेखी आश्वासन दिले. तसेच तोपर्यंत दुरशेतमार्गे अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे थांबवली जाईल, असे स्पष्ट केले.
या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले असून, प्रशासन या वेळी ठोस कारवाई करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
या आंदोलनाला अनेक राजकीय पक्षांचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांचा सक्रिय पाठिंबा लाभला. त्यामध्ये संतोष ठाकूर, डॉ. वैशाली पाटील, प्रसाद भोईर (उबाठा – रायगड जिल्हा प्रमुख), संदीप ठाकूर (मनसे – जिल्हा उपाध्यक्ष), देविदास पाटील, मोहिनी गोरे, महेश पाटील, राजू पाटील, राजेश रसाळ, सचिन पाटील, मानसी पाटील यांच्यासह शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते.