ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
रोहा विभागात विद्युत सुरक्षेचा मंत्र; तणावमुक्त जीवनासाठी महावितरणची कार्यशाळा

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
रोहा : वीजेसारख्या अत्यंत जोखमीच्या क्षेत्रात काम करताना सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. यासोबतच मानसिक तणावमुक्त राहून काम करणेही तितकेच आवश्यक असल्याचे प्रतिपादन रोहा विभागात आयोजित कार्यशाळेत करण्यात आले.
महावितरण कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत सदैव जागरूक असून आवश्यक सर्व सुरक्षा साधने व उपकरणे पुरविते. या पार्श्वभूमीवर रोहा विभाग कार्यालयाअंतर्गत ‘विद्युत सुरक्षा व तणावमुक्त जीवन जगण्याची कला’ या विषयावर दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी रोहा येथे विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा मुख्य महाव्यवस्थापक (प्रशिक्षण व सुरक्षा केंद्र) मा. अरविंद भादीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

कार्यशाळेत अतिरिक्त कार्यकारी अभियंता, प्रशिक्षण व सुरक्षा (नाशिक) डॉ. जितेंद्रकुमार राठौर यांनी संगणकीकृत सादरीकरणाद्वारे अत्यंत सोप्या भाषेत विद्युत कामकाजात घ्यावयाची दक्षता, स्वतःची सुरक्षा आणि तणावमुक्त जीवनशैली यावर मार्गदर्शन केले. दैनंदिन जीवनातील उदाहरणांच्या आधारे त्यांनी विषय अधिक प्रभावीपणे मांडला.
विद्युत लाइनवर काम करताना ‘डिस्चार्ज रॉड है तो सेफ हैं’ हा मंत्र मनात ठेवून काम केल्यास शून्य अपघात हे महावितरणचे उद्दिष्ट साध्य होऊ शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच जीवनात सर्वप्रथम स्वतःची सुरक्षा महत्त्वाची असल्याचे सांगत तणावमुक्त जीवनासाठी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. कार्यालयीन कामकाज व कौटुंबिक जीवन यामधील समतोल कसा राखावा, याबाबतही त्यांनी उपयुक्त तत्त्वे मांडली.
कार्यकारी अभियंता, रोहा प्रदीप दाळू यांनी सुरक्षित साधने वापरूनच काम करण्याचे आवाहन केले. तर कार्यकारी अभियंता, प्रशिक्षण व सुरक्षा (नाशिक) प्रमोद पाटील यांनी सुरक्षा ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असून त्यासाठी योग्य खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.
या कार्यशाळेत कर्मचाऱ्यांना सीपीआर (CPR) प्रशिक्षण देण्यात आले. कार्यक्रमास अतिरिक्त कार्यकारी अभियंता रोहा श्री. श्रावण कुमार यांच्यासह रोहा विभागातील सर्व अभियंते, तांत्रिक कर्मचारी, उपकेंद्र यंत्रचालक तसेच बाह्यस्त्रोत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




