ताज्या बातम्या

रुग्णालयातच ‘स्थानबद्ध’? सोनम वांगचुक यांना पोलिसांनी अडवल्याचा व्हिडिओ व्हायरल; प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह

उपोषण मागे घेतल्यानंतरही स्वेच्छेने बाहेर जाऊ न दिल्याचा आरोप; रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर पोलिसांशी शाब्दिक चकमक, वांगचुक यांनी रुग्णालयातच ठिय्या आंदोलन सुरू केल्याचा व्हिडिओ चर्चेत


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 

नवी दिल्ली |

ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्याशी संबंधित एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये उपोषण सोडल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल असलेल्या वांगचुक यांना पोलिसांनी रुग्णालयाबाहेर जाऊ न दिल्याचे दिसून येत असल्याचा दावा केला जात आहे. या घटनेमुळे प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, उपोषण मागे घेतल्यानंतर वांगचुक यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार पूर्ण झाल्यानंतर ते आपल्या इच्छेनुसार रुग्णालयाबाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना अडविल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यांच्यासोबत पत्नी गीतांजली वांगचुकही उपस्थित होत्या.

रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर वांगचुक आणि पोलिसांमध्ये यावेळी शाब्दिक चकमक झाल्याचे दिसून येते. पोलिसांकडून “न्यायालयाचे आदेश अद्याप प्राप्त झालेले नाहीत, त्यामुळे तुम्हाला बाहेर जाऊ देता येणार नाही,” असे सांगितले जात असल्याचे व्हिडिओमध्ये ऐकू येते.

यावर संतप्त प्रतिक्रिया देताना वांगचुक यांनी, “आजच्या इंटरनेट आणि डिजिटल युगात न्यायालयाचे आदेश तातडीने मिळविणे कठीण नाही. मग मला का रोखले जात आहे?” असा सवाल उपस्थित केल्याचे व्हिडिओमध्ये दिसते.

पोलिसांनी अडवल्यानंतरही वांगचुक आणि त्यांच्या पत्नीने रुग्णालयाबाहेर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना पुढे जाऊ दिले नाही. यानंतर संतप्त झालेल्या वांगचुक यांनी रुग्णालयाच्या परिसरातच जमिनीवर झोपून ठिय्या आंदोलन सुरू केल्याचेही व्हिडिओमध्ये दिसून येते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान, या संपूर्ण घटनेमुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. उपोषण समाप्त झाल्यानंतर आणि उपचार सुरू असताना एखाद्या व्यक्तीला रुग्णालयातून बाहेर जाण्यापासून रोखण्याचा अधिकार पोलिसांना होता का? न्यायालयाच्या आदेशांचा आधार घेत नागरिकाच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर निर्बंध घालण्यात आले का? या प्रश्नांची अधिकृत उत्तरे अद्याप समोर आलेली नाहीत.

या प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून किंवा संबंधित प्रशासनाकडून अधिकृत स्पष्टीकरण येणे अपेक्षित असून, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमुळे या संपूर्ण प्रकरणाची देशभरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
……

या लिंक वर हा व्हिडिओ आहे

https://www.facebook.com/share/v/1H663LUPz9/


Related Articles

Back to top button