ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

१८ वर्षांनंतर ‘डॅडी’ बाहेर – अरुण गवळीची नागपूर तुरुंगातून सुटका


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

नागपूर : मुंबई अंडरवर्ल्डमधील गाजलेलं नाव आणि माजी आमदार अरुण गवळी अखेर १८ वर्षांच्या कारावासानंतर जामिनावर तुरुंगातून बाहेर पडला. सर्वोच्च न्यायालयाने वय आणि आरोग्याच्या कारणावरून त्याला दिलासा दिल्यानंतर, मंगळवारी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून त्याची सुटका करण्यात आली.

गवळीला बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी विशेष सुरक्षा व्यवस्था केली होती. कारागृहाच्या मागच्या गेटमधून गुप्ततेत त्याला बाहेर आणण्यात आलं. त्यानंतर पोलीस बंदोबस्तात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेण्यात आलं आणि तेथून तो विमानाने थेट मुंबईकडे रवाना झाला.

२००६ मध्ये शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येच्या प्रकरणात गवळीचं नाव आलं होतं. या गुन्ह्यात २०१२ मध्ये मुंबई सत्र न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा आणि दंड ठोठावला. नंतर मुंबई उच्च न्यायालयानेही ती शिक्षा कायम ठेवली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने त्याला जामिनावर सोडण्याचा निर्णय दिला आहे. मात्र, हा जामीन सत्र न्यायालयाने ठरवलेल्या अटींवर आधारित राहणार असून, या प्रकरणाचा अंतिम निर्णय फेब्रुवारी २०२६ मध्ये अपेक्षित आहे.

‘डॅडी’ म्हणून ओळखला जाणारा गवळी एकेकाळी मुंबईच्या अंडरवर्ल्डमधील धडाडीचा डॉन होता. पुढे त्याने राजकारणात उडी घेतली आणि ‘अखिल भारतीय सेना’ हा पक्ष स्थापन करून विधानसभा निवडणूकही जिंकली. मात्र, त्याचा बराच काळ तुरुंगात गेला.

गवळीच्या सुटकेनंतर पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा सावध झाल्या आहेत. कारण त्याचा गुन्हेगारी भूतकाळ लक्षात घेता पुन्हा कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता फेब्रुवारी २०२६ मध्ये होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतरच गवळीच्या भविष्यासंदर्भात स्पष्ट चित्र समोर येणार आहे.


Related Articles

Back to top button