ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
“होमिओपॅथना अल्लोपॅथीची परवानगी अन्यायकारक, ग्रामीण सेवेसाठी प्रशिक्षित डॉक्टरांचीच गरज” – डॉ. विनायक पाटील

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
रायगड : “पूर्णपणे प्रशिक्षित आणि पात्र एमबीबीएस डॉक्टरांनाच आरोग्यसेवेत काम करण्याची संधी द्यावी, अन्यथा ग्रामीण रुग्णसेवेवर प्रतिकूल परिणाम होईल,” असे इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) अलिबाग शाखेचे डॉ. विनायक पाटील यांनी म्हटले आहे.
IMA अलिबाग शाखेतर्फे नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिल्हाधिकार यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले. ग्रामीण सेवेसाठी नियुक्त केलेल्या एमबीबीएस डॉक्टरांच्या नियोजनात सुधारणा करण्याची मागणी यात करण्यात आली.
डॉ. पाटील यांनी सांगितले की, “ग्रामीण सेवेसाठी आकर्षक योजना राबवणे, टेलिमेडिसिन, मोबाईल मेडिकल युनिट्स आणि डिजिटल आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हा उत्तम पर्याय आहे. पण त्यासाठी केवळ प्रशिक्षित एमबीबीएस डॉक्टरांनाच संधी मिळाली पाहिजे.”

नॅशनल मेडिकल कौन्सिल (NMC) व राज्य वैद्यकीय परिषदेच्या नियमानुसार एमबीबीएस शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना अनिवार्य इंटर्नशिप करावी लागते. मात्र ग्रामीण सेवेसाठी दोन वर्षांची नियुक्ती ही अन्यायकारक असून त्यामुळे वैद्यकीय विद्यार्थ्यांवर आर्थिक, सामाजिक व व्यावसायिक ताण वाढतो आहे, असेही IMA ने नमूद केले.
दरम्यान, सीसीएमपीटी नावाचा कोर्स सुरू करून होमिओपॅथिक डॉक्टरांना अल्लोपॅथी प्रॅक्टिसची परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयालाही डॉक्टरांनी विरोध दर्शविला असून, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभर अल्लोपॅथी डॉक्टरांनी एक दिवसाचे बंद आंदोलन केले होते.




