हत्या खटल्यात वाल्मिक कराडला मोठा झटका! दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाकडून फेटाळला; पुढील सुनावणी 4 ऑगस्टला

बीड : सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणी मुख्य आरोपी वाल्मिक कराडला आज बीड जिल्हा व सत्र न्यायालयात मोठा झटका बसला आहे. कराडने केलेला दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला असून, पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी होणार आहे. याच सुनावणीत आरोपीच्या संपत्तीविषयी निर्णय होण्याची शक्यता आहे.
दोषमुक्तीवर न्यायालयाचा ठाम नकार
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याने आपल्यावरील खटल्यातून मुक्तता देण्याची विनंती करत दोषमुक्तीचा अर्ज सादर केला होता. मात्र, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या अर्जाला जोरदार विरोध केला. न्यायालयाने सर्व युक्तिवाद ऐकून आज (22 जुलै) निर्णय देत कराडचा अर्ज फेटाळला.
अन्य आरोपींचाही अर्ज
कराडचा अर्ज फेटाळल्यानंतर दुसरे आरोपी विष्णू चाटे व इतरांनीही दोषमुक्तीच्या मागणीसाठी अर्ज सादर केले आहेत. कराडच्या वतीने जामिनासाठीही अर्ज करण्यात आला असून, त्यावरही सरकारी पक्षाकडून कडाडून विरोध करण्यात आला.
सरकारी पक्षाची भूमिका
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले की, “वाल्मिक कराडविरोधात 12-13 गंभीर आरोप ठरवण्यात यावेत, यासाठी न्यायालयात विनंती केली आहे. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर 2 महिन्यांत दोषमुक्तीचा अर्ज करणे अपेक्षित असते. मात्र, आरोपींनी ते अर्ज वेळेत दाखल केले नाहीत. त्यामुळे हे अर्ज फेटाळावेत, अशी आमची मागणी होती.”
वकील विकास खाडे यांचे स्पष्टीकरण
वाल्मिक कराडचे वकील अॅड. विकास खाडे यांनी सांगितले की, “आज न्यायालयाने आमचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला असला, तरी आम्ही याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. तसेच कराडचा जामिनाचा अर्जही प्रलंबित आहे. संपत्ती जप्तीबाबत आम्ही आमची बाजू मांडली असून बँक खाती गोठवण्याच्या आदेशावर निर्बंध उठवावेत, अशी मागणी केली आहे.”
पुढील टप्पा – 4 ऑगस्ट
या प्रकरणातील संपत्ती जप्ती, आरोप निश्चिती आणि इतर अर्जांवर आता 4 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे. देशमुख हत्या प्रकरणातील तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया अधिक वेग घेणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.