ताज्या बातम्यारायगड
स्वप्न पाहा… जिद्द ठेवा… यश नक्कीच मिळेल! – पोयनाडमध्ये युवा सेनेचा गुणगौरव सोहळा
विद्यार्थ्यांचा मेहनतीचा सन्मान, शिक्षकांच्या योगदानाचा गौरव; मानसी दळवींच्या उपस्थितीने कार्यक्रमाला उत्साह

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
रायगड : “यश त्यांचंच होतं जे मोठी स्वप्नं पाहतात आणि ती पूर्ण करण्यासाठी झटतात” — अशा प्रेरणादायी विचारांनी पोयनाड (ता. अलिबाग) येथे युवा सेनेतर्फे आयोजित विद्यार्थी-शिक्षक गुणगौरव सोहळा रंगतदार झाला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा सन्मान आणि शिक्षकांच्या योगदानाचा गौरव करताना उपस्थित मान्यवरांनी युवकांना उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आणि सातत्याची ताकद अधोरेखित केली.

पोयनाड येथे युवा सेना उपतालुका प्रमुख निखिल तावडे यांच्या पुढाकाराने विद्यार्थी-शिक्षक गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला शिवसेनेच्या नेत्या मानसी दळवी, रायगड जिल्हाप्रमुख राजा केणी, महिला आघाडीच्या जिल्हा संपर्कप्रमुख संजीवनी नाईक, महिला आघाडी तालुकाप्रमुख भाग्यश्री पाटील, पोयनाड ग्रामपंचायतच्या सरपंच अनिता गंभीर आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.

तसेच देवेंद्र तावडे, निखिल तावडे यांच्यासह गावातील अनेक ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी शिक्षणासह इतर क्षेत्रांत मिळवलेल्या यशाचा सत्कार करण्यात आला. शिक्षकांच्या समाजातील योगदानाचा गौरव करून त्यांना मानचिन्ह व स्मृतिचिन्ह देण्यात आले. यावेळी मानसी दळवी यांनी “युवकांनी स्वप्न पाहण्याचं थांबवू नये, जिद्दीने आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास यश अटळ आहे” असा संदेश देत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

गावातील शैक्षणिक वातावरण वृद्धिंगत होऊन विद्यार्थ्यांना अधिक मेहनत घेण्याची प्रेरणा मिळावी, हा या सोहळ्याचा मुख्य हेतू असल्याचे आयोजकांनी सांगितले.
