ताज्या बातम्यारायगड
“सेवांगण फाउंडेशनचा उपक्रम: आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप”

अलिबाग : सेवांगण फाउंडेशनतर्फे अलिबाग तालुक्यातील ठाकर, आदिवासी समाज आणि विटभट्टीवर मजुरी करणाऱ्या कुटुंबातील सुमारे 110 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि स्कूल बॅग्स वितरित करण्यात आल्या.
या उपक्रमाचे आयोजन संस्थेच्या अध्यक्षा मनिषा नाईक, सचिव विनायक नाईक आणि प्रकल्प समन्वयिका स्वप्नाली नाईक यांनी केले होते. ‘डोनेट एड सोसायटी, पुणे’ या संस्थेचे या उपक्रमाला विशेष सहकार्य लाभले.
सेवांगण फाउंडेशन अलिबागमधील दुर्गम आदिवासी वाड्यांमध्ये, पाड्यांमध्ये आणि विटभट्टी परिसरात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक उन्नतीसाठी कार्यरत आहे. शिक्षणात अडथळा येऊ नये, यासाठी संस्था थेट गावपातळीवर जाऊन काम करत आहे.
विद्यार्थ्यांना शिक्षणात रुची निर्माण व्हावी, शाळेत नियमित हजेरी लागावी आणि त्यांच्या भविष्याचा मजबूत पाया तयार व्हावा, या हेतूने सेवांगणचा हा प्रयत्न आहे.
संस्था मानते की शिक्षण आणि सर्वांगीण विकासाच्या माध्यमातून ही मुले समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकतात. या दृष्टीने सेवांगण फाउंडेशनचे कार्य सातत्याने सुरू आहे.