ताज्या बातम्या
जयंत पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती; पीएनपी नाट्यगृहाच्या नव्या पर्वाची सुरुवात

| रायगड | प्रतिनिधी
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस व माजी आमदार जयंत पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन सोमवार, ७ जुलै रोजी सकाळी १० वाजता अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृहात होणार आहे. या विशेष सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, अनेक राजकीय दिग्गज नेत्यांची उपस्थिती या वेळी दिसून येणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजन ‘जयंतभाई पाटील अभिष्टचिंतन सोहळा समिती’ च्या वतीने करण्यात आले असून, वाढदिवसानिमित्त जिल्हाभरात विविध सामाजिक उपक्रम आणि जनसेवा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कोण कोण राहणार उपस्थित?
या कार्यक्रमाला खासदार निलेश लंके, नेत्या सुषमा अंधारे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार बाबासाहेब देशमुख, नारायण पाटील, माजी आ. बाळाराम पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, ॲड. मानसी म्हात्रे, तसेच अन्य अनेक शेकाप व महाविकास आघाडीतील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
शरद पवार यांचे जल्लोषात स्वागत
खासदार शरद पवार यांचे आगमन पेझारी नाका येथे होणार असून, शेकापच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत करण्यात येईल. त्यानंतर पीएनपी नाट्यगृहात झाल्यावर त्यांच्या हस्ते नूतनीकरण झालेल्या नाट्यगृहाचा औपचारिक शुभारंभ होणार आहे.
—
पीएनपी नाट्यगृह पुन्हा सज्ज – नव्या रूपात खुले होणार कलाकारांसाठी
१५ जून २०२२ रोजी लागलेल्या भीषण आगीने पीएनपी नाट्यगृहाचे मोठे नुकसान झाले होते. गेली तीन वर्षे अलिबागमधील रंगभूमी शांत होती. मात्र, शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील व अध्यक्षा चित्रलेखा पाटील यांच्या अथक प्रयत्नांमुळे हे नाट्यगृह आता नव्या जोमाने सज्ज झाले आहे.
नव्या सुविधांसह आधुनिक रंगभूमी
वातानुकूलित सभागृह
JBL साऊंड सिस्टीम
सुसज्ज आसन व्यवस्था
मुबलक पार्किंग
सर्वसामान्यांसाठी परवडणारे दर
स्थानिक कलाकारांना सवलती
‘ॲड. नाना लिमये रंगमंचा’वर विविध कार्यक्रम
या नाट्यगृहाच्या माध्यमातून जिल्ह्यातील नवोदित कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार असून, अलिबागच्या सांस्कृतिक जिवंततेला नवा श्वास मिळणार आहे.