ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबई
कंत्राटाच्या नावाखाली महिलेचा सन्मान धोक्यात? रिलायन्सच्या अधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल
मुदतवाढीचे आमिष दाखवत हॉटेलमध्ये भेटण्याची मागणी केल्याचा आरोप; महिला कंत्राटदाराच्या तक्रारीनंतर नागोठणे पोलिसांची कारवाई

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
नागोठणे |
कामाच्या कंत्राटाची मुदत वाढवून देण्याचे आमिष दाखवत एका महिला कंत्राटदाराशी गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यावर करण्यात आला आहे. महिला कंत्राटदाराने दिलेल्या तक्रारीनंतर नागोठणे पोलिसांनी रिलायन्स कंपनीचे अधिकारी रमेश धनावडे (58), रा. अलिबाग, जि. रायगड यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून या घटनेमुळे कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बेणसे येथील रिलायन्स इस्टेट कार्यालयात ४ जून २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पीडित महिला कंत्राटदार यांना रिलायन्स कंपनीकडून झोतिरपाडा येथील गटार बांधकामाचे कंत्राट देण्यात आले होते. या कंत्राटाची मुदत संपत आल्याने मुदतवाढीबाबत चर्चा करण्यासाठी त्यांना कार्यालयात बोलावण्यात आले होते.
तक्रारीनुसार, महिला त्यांच्या सासूसह संबंधित अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये गेल्या असता कंत्राटाच्या मुदतवाढीवर चर्चा सुरू झाली. यावेळी आरोपीने कथितपणे महिला फिर्यादीला, “तुम्ही इथे कशाला आलात, आपण हॉटेलमध्ये भेटलो असतो, तिथे मी तुमच्या कंत्राटाची मुदत वाढवून देतो,” असे सांगितल्याचा आरोप आहे. तसेच आरोपीने महिलेचा हात पकडून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे महिला हादरून गेली. त्यानंतर त्यांनी तात्काळ नागोठणे पोलीस ठाणे गाठून संपूर्ण घटनेची तक्रार दिली. महिलेच्या फिर्यादीवरून नागोठणे पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक १०१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ७४ तसेच संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नागोठणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवून असून पुढील तपास महिला सहाय्यक फौजदार सानप करीत आहेत. कंत्राटाच्या मुदतवाढीसारख्या प्रशासकीय प्रक्रियेचा आधार घेत महिलांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला का, याबाबतही परिसरात चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, दुसरीकडे, महिलेने केलेले आरोप रमेश धनावडे यांनी नाकारले असून ते बिनबुडाचे असल्याचा दावा केला आहे. तसेच संबंधित महिलेविरोधात आपणही तक्रार दिली असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.




