ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

समतेचा ध्यास आणि परिवर्तनाची ऊर्जा म्हणजे दीक्षाभूमी- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दीक्षाभूमीला भेट देऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले अभिवादन


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

नागपूर, ता, 14 : समतेच्या, स्वाभिमानाच्या आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारांनी भारलेली दीक्षाभूमी ही केवळ एक वास्तू नसून, कोट्यवधींच्या आशा-आकांक्षांचे तीर्थस्थान आहे. येथे नतमस्तक होणारा प्रत्येक जण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची नवी ऊर्जा आणि संघर्षाची प्रेरणा मनात घेऊन परततो, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दीक्षाभूमीच्या पावन भूमीवर केले.

नागपूर येथे आल्यानंतर नेहमीप्रमाणे त्यांनी दीक्षाभूमीला भेट देत महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन केले. त्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.

१४ ऑक्टोबर १९५६ रोजी बाबासाहेबांनी याच दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्यानंतर कोट्यवधी अनुयायांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला. त्यामुळे दीक्षाभूमी हे केवळ एक स्थळ नसून, सामाजिक परिवर्तनाचे आणि समतेचे बलस्थान आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला जगातील सर्वोत्कृष्ट संविधान दिले. या संविधानाच्या आधारावर देश आणि राज्याचा कारभार चालतो, असे सांगत त्यांनी संविधानामुळेच सामान्य माणूस मुख्य प्रवाहात आला असल्याचे अधोरेखित केले. न्याय शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांची जोपासना व्हावी, हीच बाबासाहेबांची शिकवण असल्याचे शिंदे म्हणाले.

“शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही समाजाला दिशा देत असून, संविधानामुळे सर्वसामान्य व्यक्ती उच्च पदापर्यंत पोहोचू शकते, याची अनेक उदाहरणे देशात दिसून येतात, असे त्यांनी सांगितले.

बाबासाहेबांच्या योगदानाचा गौरव म्हणून २०१५ पासून देशात संविधान दिन साजरा केला जात आहे, याची आठवण करून देताना, या निर्णयासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही उल्लेख केला.

विदर्भाच्या विकासाबाबत बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, गेल्या साडेतीन वर्षांत विदर्भासाठी अनेक विकास प्रकल्प आणि योजना राबविण्यात आल्या आहेत. तसेच मुंबईसाठीही अलीकडेच महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हाच या अधिवेशनाचा केंद्रबिंदू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“बाबासाहेब आणि भारतीय संविधान हे अतूट नाते आहे. बाबासाहेबांबद्दल कितीही बोलले तरी ते अपुरेच आहे,” असे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा महामानवांना आदरांजली अर्पण केली.

….


Related Articles

Back to top button