‘संजीवनी ब्लड ग्रुप रजिस्ट्री ॲप’चे लोकार्पण – रक्तदाते व रुग्णांमध्ये डिजिटल पूल

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
रायगड : वोक्हार्ट फाऊंडेशनच्या संकल्पनेतून आणि एलआयसी हौसिंग फायनान्स लिमिटेडच्या सीएसआर अर्थसहाय्याने विकसित झालेल्या ‘संजीवनी ब्लड ग्रुप रजिस्ट्री ॲप चे लोकार्पण आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते आरोग्य भवन येथे झाले. या ॲपसाठी राज्य रक्त संक्रमण परिषद (एसबीटीसी) आणि आरोग्य विभागाचे मार्गदर्शन लाभले आहे.
या प्रसंगी आरोग्य विभागाचे डॉ. नितीन अंबाडेकर, एलआयसीएचएफएलच्या अनिथा पी.एस. कुमारी व यश जैन, फेस्कॉमचे सुरेश पोटे, वोक्हार्ट फाऊंडेशनच्या डॉ. पल्लवी छनाना आदी मान्यवर उपस्थित होते.

अनेकदा रक्ताची गरज असताना पुरवठा आणि मागणी यामध्ये तफावत निर्माण होते. अपघात, शस्त्रक्रिया, थॅलेसेमिया, कर्करोग व गरोदरपणातील गुंतागुंत यावेळी रक्त वेळेवर न मिळाल्यास जीव धोक्यात येतो. या समस्येवर उपाय म्हणून ‘संजीवनी ॲप विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले असून ते गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करता येईल.
या ॲपमुळे ब्लड बँकांना एका क्लिकवर नोंदणीकृत रक्तदात्यांशी संपर्क साधता येणार आहे. रक्तदात्यांना नोटिफिकेशन मिळून ते आपल्या उपलब्धतेनुसार रक्तदान करू शकतील. सर्व माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी ॲपमध्ये एन्क्रिप्शन तंत्रज्ञान वापरले गेले आहे.

आरोग्यमंत्री आबिटकर म्हणाले, “रक्तदान क्षेत्रात एसबीटीसी आणि आरोग्य विभाग महत्त्वाचे कार्य करत आहेत. एनजीओ आणि सीएसआरच्या सहकार्याने समाजकार्याला बळकटी देता येते, याचे उदाहरण या उपक्रमातून घालून दिले आहे. राज्यातील १८ ते ६५ वयोगटातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे,” असे आवाहन त्यांनी केले.
एलआयसीएचएफएलच्या अनिथा कुमारी यांनी या ॲपला “तंत्रज्ञान आणि मानवतेचा संगम” असे संबोधले, तर डॉ. पल्लवी छनाना यांनी “हे साधन रक्तसंकलन अधिक वेगवान व सुलभ करेल” असे मत व्यक्त केले.
—




