ताज्या बातम्यारायगड
“शेवटचा श्वास नातवाच्या हातात: म्हसळा हादरलं…”
नातवाकडून आजोबाची हत्या: म्हसळ्यातील गूढाचा पोलिसांनी तीन तासांत केला उलगडा!

रायगड | म्हसळा
म्हसळा तालुक्यातील खांदा मोहत्ला परिसरात शांततेचा चेहरा पांघरलेले एक घर अचानक पोलिसांच्या गाड्यांनी आणि शेजाऱ्यांच्या कुजबुजींनी गजबजून गेलं. ७२ वर्षीय शौकत अली हुसेनमियाँ परदेशी यांचा मृतदेह घरात आढळून आला आणि त्यांच्या नातवाने, केवळ १८ वर्षांचा मोहमद असगर अली परदेशी याने पोलिसांना सांगितले – “कोणी तरी घरात घुसून आजोबांना मारून पळून गेला!” पण पोलिसांचा संशय जागा होता.
तीन तासांत सत्य उजेडात
म्हसळा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शेजाऱ्यांकडून गोळा केलेली माहिती, मृतदेहाच्या तपासणीतील निष्कर्ष आणि आरोपीच्या बोलण्यातले विसंगती टिपत, केवळ तीन तासांत गूढाचा पर्दाफाश केला.
शौकत अली यांचाच नातू – मोहमद असगर अली परदेशी हाच खून करणार असल्याचं उघड झालं!
दडपण, अपमान आणि सूडाची भावना
मोहमद माणगाव येथील द.ग. तटकरे हायस्कूलमध्ये शिकत होता. मात्र त्याच्या आजोबांकडून सतत टोमणे – “तू कितीही शिकलास तरी काही होणार नाहीस”, “तू नालायकच राहशील” – यामुळे त्याच्या मनात राग साठत गेला.
शिवाय, मोहमदच्या आईकडे शौकत अली वाईट नजरेने पाहत असल्याचेही काही नातेवाईकांनी सांगितले. या सगळ्यामुळे रागाचा स्फोट झाला आणि संधी मिळताच मोहमदने स्वतःच आजोबांचा गळा दाबून खून केला.
खूनानंतरची बनावट कथा
खून केल्यानंतर, तोच पोलिसांना गोंधळवणारी गोष्ट सांगू लागला – “कोणी तरी पळून गेला!” पण पोलिसांचा अनुभव, त्यांची शंका आणि शेजाऱ्यांकडून मिळालेली माहिती यातून सत्य हळूहळू बाहेर येऊ लागलं.
पोलिसांचं कौतुकास्पद कामगिरी
कमी वेळात, तपासकौशल्य दाखवत म्हसळा पोलिसांनी केवळ तीन तासांत आरोपीला उघड केलं. नातवाकडून आजोबाच्या हत्येचा उलगडा ही एक कौटुंबिक हृदयद्रावक आणि क्रूर कहाणी ठरली आहे.