ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड

वीज व्यवस्थापनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर; महावितरणचे महत्त्वपूर्ण पाऊल!

 ‘स्मार्ट’ वीज वितरणाकडे महावितरणची वाटचाल; जीईएपीपीसोबत एआय प्रकल्पाचा करार


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
मुंबई : राज्यातील वीज वितरण यंत्रणा अधिक कार्यक्षम आणि आधुनिक करण्यासाठी महावितरणकडून मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. वीज उपकेंद्र, रोहित्रे आणि वीजवाहिन्यांचे डिजिटायझेशन कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) आणि मशीन लर्निंग च्या साहाय्याने करण्यासाठी महावितरण आणि ग्लोबल एनर्जी अलायन्स फॉर पीपल अँड प्लॅनेट (GEAPP-India) या संस्थेमध्ये आज सामंजस्य करार झाला.
या करारावर महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र आणि जीईएपीपीचे उपाध्यक्ष (भारत) सौरभ कुमार यांनी स्वाक्षऱ्या केल्या. या वेळी महावितरणचे संचालक (संचालन/प्रकल्प) सचिन तालेवार, संचालक (वाणिज्य) योगेश गडकरी आणि कार्यकारी संचालक धनंजय औंढेकर उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणकडून माहिती-तंत्रज्ञानाचा वापर करून वीज पुरवठा व्यवस्थेची गुणवत्ता व कार्यक्षमता वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून वीज यंत्रणेचे एआय-आधारित डिजिटायझेशन राबवले जाणार आहे.
लोकेश चंद्र म्हणाले, “या डिजिटायझेशनमुळे वीज व्यवस्थापन अधिक अचूक आणि प्रभावी होईल. वीजहानी कमी होऊन ग्राहकांना दर्जेदार व अखंड वीजपुरवठा देता येईल. तसेच हरित ऊर्जेचा वापर आणि वीज वितरण जाळ्याची मजबुती यासाठीही हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल.”
जीईएपीपीचे उपाध्यक्ष सौरभ कुमार म्हणाले, “महावितरणकडून राबवला जाणारा हा एआय प्रकल्प देशातील इतर वीज कंपन्यांसाठी आदर्श ठरेल.”
या उपक्रमांतर्गत वीज वितरण यंत्रणेचे रिअल टाइम विश्लेषण होणार असून, दुरुस्ती, देखभाल, भार व्यवस्थापन आणि वीज खरेदीची अचूक मागणी याबाबत तत्काळ माहिती मिळणार आहे. परिणामी वीज पुरवठा अधिक विश्वसनीय आणि परिणामकारक पद्धतीने दिला जाईल.

Related Articles

Back to top button