ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
‘महा’संग्रामाचा शंखनाद! राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये एकाच टप्प्यात निवडणूक, 7 वर्षांची प्रतीक्षा संपली; 15 जानेवारीला मतदान 16 जानेवारीला निकाल

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
मुंबई, ता, 15 : राज्यात गेल्या सात वर्षांपासून रखडलेल्या आणि मुदत संपलेल्या महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज (१५ डिसेंबर) पत्रकार परिषदेत ही महत्त्वाची घोषणा केली.
या निर्णयानुसार राज्यातील मुदत संपलेल्या २७ महापालिका आणि नव्याने स्थापन झालेल्या २ महापालिका अशा एकूण २९ महापालिकांसाठी निवडणुका होणार आहेत. या सर्व महापालिकांच्या निवडणुका एकाच टप्प्यात घेतल्या जाणार असून १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान, तर १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे.

निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच संबंधित २९ महापालिका क्षेत्रांमध्ये आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग येणार असून प्रचाराचा धडाका आता वाढताना दिसणार आहे. इच्छुक उमेदवारांकडून मतदारांच्या भेटीगाठी, प्रचार सभा आणि संपर्क मोहिमा सुरू होण्याची शक्यता आहे.
राज्याच्या राजकारणात दीर्घकाळ चर्चेत असलेल्या महापालिका निवडणुकांच्या घोषणेमुळे राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. नामनिर्देशन पत्रे ऑफलाईन पद्धतीने स्वीकारली जाणार असून, हा निर्णय राजकीय पक्षांच्या मागणीनुसार घेण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
महापालिका निवडणूक कार्यक्रम
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत : २३ ते ३० डिसेंबर २०२५
अर्जांची छाननी : ३१ डिसेंबर २०२५
उमेदवारी माघार : २ जानेवारी २०२६
अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप : ३ जानेवारी २०२६
मतदान : १५ जानेवारी २०२६
मतमोजणी : १६ जानेवारी २०२६
दरम्यान, काही महापालिकांमध्ये ५० टक्के आरक्षण मर्यादेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. मात्र, न्यायालयाकडून निवडणूक न घेण्याचा कोणताही आदेश नसल्याने सर्व २९ महापालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणासाठी या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात असून, आगामी काळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र राजकीय लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
…..
खाली प्रदेशनिहाय (विभागनिहाय) २९ महानगरपालिकांची यादी दिली आहे
—
🟦 कोकण विभाग
1. बृहन्मुंबई महानगरपालिका
2. ठाणे महानगरपालिका
3. नवी मुंबई महानगरपालिका
4. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका
5. मीरा-भाईंदर महानगरपालिका
6. वसई-विरार महानगरपालिका
7. पनवेल महानगरपालिका
8. उल्हासनगर महानगरपालिका
9. भिवंडी-निजामपूर महानगरपालिका
—
🟩 पश्चिम महाराष्ट्र
10. पुणे महानगरपालिका
11. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
12. सोलापूर महानगरपालिका
13. कोल्हापूर महानगरपालिका
14. सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका
15. इचलकरंजी महानगरपालिका
—
🟨 उत्तर महाराष्ट्र
16. नाशिक महानगरपालिका
17. मालेगाव महानगरपालिका
18. धुळे महानगरपालिका
19. जळगाव महानगरपालिका
20. अहमदनगर महानगरपालिका
—
🟥 मराठवाडा
21. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) महानगरपालिका
22. नांदेड-वाघाळा महानगरपालिका
23. लातूर महानगरपालिका
24. परभणी महानगरपालिका
25. जालना महानगरपालिका
—
🟪 विदर्भ
26. नागपूर महानगरपालिका
27. अमरावती महानगरपालिका
28. अकोला महानगरपालिका
29. चंद्रपूर महानगरपालिका
—




