विश्व हिंदू रक्षा परिषदेत अमरजित पांडे यांच्यावर राष्ट्रीय महामंत्रीपदाची धुरा
राष्ट्रहित व सामाजिक कार्याची दखल; संघटन विस्ताराची महत्त्वाची जबाबदारी

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
विश्व हिंदू रक्षा परिषदेकडून अमरजित जयनारायण पांडे यांची भारताचे राष्ट्रीय महामंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रहित आणि सनातन समाजाच्या विकासासाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आल्याचे नियुक्तीपत्रात नमूद आहे.
संघटनेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष गोपाल राय यांच्या निर्देशानुसार झालेल्या या नियुक्तीनंतर पांडे यांच्यावर संघटन विस्तार, सामाजिक उपक्रमांना चालना आणि विविध स्तरांवरील पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी असेल. संघटनेच्या कार्याचा नियमित आढावा घेऊन त्याचा अहवाल लखनऊ येथील मुख्यालयाला सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
नियुक्तीनंतर एका महिन्यात संघटनात्मक कार्याचा अहवाल सादर करणे तसेच दर महिन्याच्या पहिल्या रविवारी होणाऱ्या आढावा बैठकीस उपस्थित राहणे अपेक्षित आहे. सलग दोन बैठकींना अनुपस्थित राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्याचेही नियुक्तीपत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
संघटनेचा विस्तार करताना नवीन पदाधिकारी व सदस्य जोडण्यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले असून, पांडे यांच्या नियुक्तीमुळे संघटनेच्या कार्याला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.




