वांद्रे–कुर्ला दरम्यान पॉड टॅक्सी : आधुनिक सार्वजनिक वाहतुकीकडे मोठे पाऊल

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
मुंबई : वांद्रे ते कुर्ला दरम्यान ‘पॉड टॅक्सी’ प्रकल्पाला गती देण्यासाठी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत पॉड टॅक्सी प्रकल्पाचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले.
बीकेसी परिसरातील वाढत्या वर्दळीला पर्यायी, आधुनिक आणि जलद वाहतूकसेवा म्हणून ‘पॉड टॅक्सी’ हा महत्त्वाचा प्रकल्प ठरणार असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे वांद्रे–कुर्ला रेल्वे स्थानकांदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळणार आहे. हा देशातील एकमेव आणि मॉडेल प्रकल्प ठरावा, यासाठी कामाला गती द्यावी, अशा स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
बैठकीला उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नविन सोना, एमएमआरडीए आयुक्त संजय मुखर्जी, अतिरीक्त आयुक्त अश्विन मुदगल, पोलिस महानिरीक्षक अनिल कुंभारे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.




