ताज्या बातम्यारायगड
पेणमध्ये जागतिक आदिवासी दिन उत्साहात; 40 तरुणांना वाहन परवाने, शोभायात्रा-नृत्याने जल्लोष

पेण : विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या पेण तालुक्यातील आदिवासी समाजाने आपले दुःख विसरून उत्साहात जागतिक आदिवासी दिन साजरा केला. 9 ऑगस्ट 1994 रोजी जागतिक पातळीवर आदिवासी दिनाची घोषणा झाल्यापासून दरवर्षी भारतभर हा दिवस साजरा केला जातो. ठिकठिकाणी पारंपरिक नृत्य, शोभायात्रा यांद्वारे कार्यक्रम होत असताना पेण तालुक्यातील आदिवासी तरुणांनी यावर्षी समाजोपयोगी व प्रबोधनात्मक उपक्रमांच्या माध्यमातून हा दिवस विशेष केला.
आदिवासी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते सुनील वाघमारे यांच्या पुढाकाराने तालुक्यातील 40 आदिवासी तरुणांची वाहन चालक परवान्यासाठी ऑनलाईन नोंदणी करून शिकाऊ परवाने वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. तसेच “आदिवासी समाजाच्या समस्या आणि त्यावरील पर्याय” या विषयावर ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष, रायगड भूषण संतोष ठाकूर यांचे मार्गदर्शन झाले.

कार्यक्रमाची सुरुवात पेण कृषी उत्पन्न बाजार समिती येथून भोगावती नदीपर्यंत काढलेल्या मिरवणुकीने झाली. नंतर भुंडा पुलासमोरील उद्यानासमोर सभा पार पडली. प्रारंभी आदिवासी मुलींनी पारंपरिक नृत्य सादर केले. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत तरुणांना शिकाऊ परवाने वाटप करण्यात आले.
सभेत विविध मान्यवरांनी आदिवासी हक्क, समस्या आणि एकजुटीबाबत मनोगते व्यक्त केली. “कोण म्हणतोय वनवासी, आम्ही सारे आदिवासी”, “आदिवासी ढोर न्हाय, या देशाचा मालक हाय” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

या कार्यक्रमाला गीता वाघमारे, जितेंद्र वाघमारे, रेणुका हीलम, रोहित वाघमारे, राजेंद्र पवार, अक्षय वाघमारे, नरेश कडू, मनोज वाघे, गणेश वाघमारे, अनिल पवार, अविनाश वाघमारे, मनीष वाघमारे, गणपत वाघमारे, परशुराम, संजय वाघमारे, विजय वाघमारे, रवी मुरकुटे यांच्यासह शेकडो आदिवासी बांधव उपस्थित होते.