लाच घेताना पनवेलचा पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

अलिबाग : पनवेल शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक सचिन वामन वाईकर याला ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना अँटिकरप्शन ब्युरोच्या (ACB) अलिबाग पथकाने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई उरण नाका, पनवेल येथे करण्यात आली.
तक्रारदाराच्या वडिलांविरोधात दाखल गुन्ह्यात कलम वाढ करून जामीन नाकारण्याची भीती दाखवून आरोपी वाईकर यांनी १ लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर ५० हजार रुपये देण्याचे ठरले. तक्रारदाराने याबाबत अँटिकरप्शन विभागाकडे तक्रार केली होती.
पडताळणी दरम्यान वाईकर यांनी एमएसईबी कार्यालयासमोर तक्रारदाराकडे लाचेची रक्कम मागितली होती. त्यानुसार, जुना पनवेल येथील मारुती कुशन परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी वाईकर यांनी खाजगी व्यक्ती रविंद्र ऊर्फ सचिन सुभाष बुट्टे (वय ३०, रा. करंजाडी, सेक्टर १, पनवेल) याच्यामार्फत लाचेचे पैसे स्वीकारले. त्यांना दोघांनाही रंगेहाथ पकडण्यात आले असून, आरोपी पोलीस उपनिरीक्षक व खाजगी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई अँटिकरप्शन ब्युरो ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक संजय गोविलकर व सुहास शिंदे, तसेच रायगड-अलिबागचे पोलीस उप अधीक्षक सरिता भोसले आणि निरीक्षक निशांत धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
सापळा पथकात सरिता भोसले, निशांत धनवडे, सहा. फौजदार विनोद जाधव, पो.ह. महेश पाटील, आणि पोशि नवदीत नांदगावकर यांचा समावेश होता.
नागरिकांना आवाहन:
कोणत्याही प्रकारचा लाचखोरीचा अनुभव आल्यास, नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागातर्फे करण्यात आले आहे.