राष्ट्रवादीचा नवसंघटनाचा टप्पा सुरू; शशिकांत शिंदेंकडे सूत्रे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदी ज्येष्ठ नेते शशिकांत शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. मावळते अध्यक्ष जयंत पाटील यांच्या राजीनाम्यानंतर ही जबाबदारी शिंदे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली.
शरद पवार यांच्या अत्यंत जवळच्या आणि विश्वासू नेत्यांपैकी एक म्हणून ओळख असलेल्या शशिकांत शिंदे यांना संधी मिळाल्याची जोरदार चर्चा आहे. मंगळवारी पार पडलेल्या पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीत जयंत पाटील यांनीच शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, आणि सर्वानुमते त्याला मंजुरी देण्यात आली.
शिंदे हे पक्षाच्या स्थापनेपासून शरद पवारांसोबत खंबीरपणे उभे राहिले आहेत. पक्षात फूट पडली तरी त्यांनी पवारांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला. संघटनात्मक बांधणीचा त्यांना मोठा अनुभव असून पश्चिम महाराष्ट्रातील प्रभावी नेत्यांमध्ये त्यांची गणना होते.
—
कोण आहेत शशिकांत शिंदे?
शशिकांत शिंदे यांचा जन्म १९ ऑक्टोबर १९६३ रोजी जावळी तालुक्यातील हुमगाव येथे झाला. ते वाणिज्य शाखेचे पदवीधर असून माथाडी कामगारांच्या हक्कांसाठी लढणारे एक संघर्षशील नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या वडिलांचं नाव जयवंतराव शिंदे तर आईचं नाव कौसल्या शिंदे.
शिंदे यांनी १९९९ साली प्रथमच जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि मोठ्या फरकाने विजय मिळवला. यानंतर त्यांनी कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळाचे जलसंपदामंत्री म्हणूनही काम पाहिले.
२००९ ते २०१४ या काळात त्यांनी कोरेगाव मतदारसंघाचे आमदार म्हणून काम केले. या निवडणुकीत त्यांनी ज्येष्ठ नेत्या शालिनीताई पाटील यांचा पराभव केला होता.
शिंदे हे एकूण चार वेळा आमदार राहिले असून सध्या विधान परिषदेचे सदस्य आहेत. याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे मुख्य प्रतोद म्हणून ते जबाबदारी सांभाळत आहेत.
लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघातून त्यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर कोरेगाव विधानसभा मतदारसंघातही त्यांना अपयश आले.
….
नव्या जबाबदारीवर शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर शशिकांत शिंदे यांनी सांगितले, “मी सामान्य जनतेचे प्रश्न सरकारपुढे ठामपणे मांडणार आहे. पक्षाला पुन्हा सत्तेच्या दिशेने नेण्यासाठी मी रात्रंदिवस मेहनत घेईन.”
पक्षात कोणताही गोंधळ न होता, शिंदे यांच्या नावावर एकमत झाले हेच त्यांच्या नेतृत्वावरील विश्वासाचे लक्षण मानले जात आहे.
—
© 2025 Satyamev Jayate News dot com सर्व हक्क राखीव.