ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगड

रायगड ते लंडन : क्रिकेट नियम चर्चेत! उरण येथील प्रशिक्षक नयन कट्टा यांचा सहभाग अधोरेखित 


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग  |
क्रिकेटचे नियम तयार करणारी जगप्रसिद्ध संस्था Marylebone Cricket Club (एमसीसी) यांनी २०२६ साठी क्रिकेटच्या नियमांमध्ये काही बदल जाहीर केले असून हे बदल पुढे International Cricket Council (आयसीसी) क्रिकेट समितीकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहेत. आयसीसीची मान्यता मिळाल्यानंतर १ ऑक्टोबर २०२६ पासून हे नियम अमलात येण्याची शक्यता आहे.
या नियमांबाबत रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील क्रिकेट प्रशिक्षक व नियम अभ्यासक नयन कट्टा यांनी वेळोवेळी एमसीसीला विविध सूचना पाठविल्या होत्या. एमसीसीकडून प्राप्त अधिकृत ईमेलमध्ये त्यांच्या सूचनांचा नियमांच्या चर्चाप्रक्रियेत सहभाग असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
एमसीसी लॉज कमिटीचे अॅडव्हायझर जॉनी सिंगर यांनी ४ फेब्रुवारी २०२६ रोजी पाठविलेल्या ईमेलमध्ये म्हटले आहे की, क्रिकेटच्या नियमांमध्ये बदल करताना जगभरातून अनेक सूचना येतात आणि त्या विविध समित्यांच्या चर्चेनंतर अंतिम स्वरूपात स्वीकारल्या जातात. त्यामुळे कोणत्याही एकाच व्यक्तीस विशिष्ट नियमाचे अधिकृत श्रेय देता येत नसले तरी अशा सूचनांमुळे नियम अधिक सक्षम बनतात. त्यांनी नयन कट्टा यांच्या योगदानाबद्दल आभारही व्यक्त केले आहेत.
यापूर्वीही त्यांनी एमसीसीच्या आधीच्या आवृत्त्यांमध्ये नियमांबाबत सूचना केल्या होत्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तीन वर्षांत रायगड जिल्ह्यातील अनेक पंचांनी महाराष्ट्र व मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पंच परीक्षेत यश संपादन केले आहे.
———-
काय आहेत नियम ?
……..
क्रिकेट नियम 2026 : वाद कमी करण्यासाठी ICC कडून स्पष्टता, 7 महत्वाचे बदल
  1. बॉल ‘डेड’ कधी मानायचा आणि ओव्हर नेमकी कधी संपते याबाबत स्पष्टता देण्यात आली आहे. तसेच संबंधित नियमात आधी गहाळ असलेला संदर्भ जोडण्यात येणार आहे.
  2. फील्डरच्या चुकीच्या थ्रोमुळे मिळणाऱ्या ओव्हरथ्रो धावा कोणत्या क्षणापर्यंत मोजायच्या हे निश्चित करण्यात आले आहे.
  3. बॉलर धावत येत असताना फलंदाज तयार नसल्यास किंवा मागे हटल्यास चेंडू वैध मानायचा की नाही याबाबत स्पष्ट नियम करण्यात आला आहे.
  4. कॅच घेताना चेंडू फक्त हाताला लागणे आणि पूर्ण नियंत्रणात येणे यात फरक स्पष्ट करून ‘खरा कॅच’ नेमका कधी मानायचा हे निश्चित करण्यात आले आहे.
  5. सीमारेषेबाहेरून उडी मारून घेतलेले कॅच वैध की अवैध यासाठी एकसमान अधिकृत नियम लागू करण्यात येणार आहे.
  6. पंचांनी ‘टाइम’ दिल्यानंतर खेळातील कोणत्या घटना ग्राह्य धरायच्या याबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यात आली आहेत.
  7. नियमपुस्तकातील तांत्रिक लेखनदोष दुरुस्त करून ‘बॅट’ हा आवश्यक शब्द समाविष्ट करण्यात येणार आहे.

एकूणच हे सर्व बदल नवीन नियम नसून खेळातील वाद टाळण्यासाठी आणि निर्णय अधिक अचूक करण्यासाठी करण्यात आलेली अधिकृत स्पष्टता असल्याचे मानले जात आहे.

….


Related Articles

Back to top button