ताज्या बातम्यादेश विदेशमहाराष्ट्रमुंबईरायगडसंपादकीय

रायगडमध्ये सत्तेचा मलिदा कोण खाणार!  जयंत पाटील विरुद्ध सुनील तटकरे – जनता प्यादी, नेते बादशहा


फडशा
सत्तेच्या हव्यासावर घाव!
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 
आविष्कार देसाई 
रायगड : जिल्ह्याचे राजकारण म्हणजे मांडवलीचा खेळ होऊन बसल्याचे चित्र आहे. स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येताच शेकापने रणशिंग फुंकलं आणि लगेचच सत्तेच्या गल्लीबोळात धुरळा उडाला. कालपर्यंत खांद्याला खांदा लावून शिवसेना-भाजपला बाहेर लोटणारे जयंत पाटील आणि सुनील तटकरे आज एकमेकांचे शत्रू बनलेत. त्यातच भाजपा आणि शिंदे यांची शिवसेना सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी धडपडत आहे. तर आपल्याला कोण सामावून घेणार या विचारांमध्ये काँग्रेस पडली आहे.  राजकारणी सत्ता आणि निधीच्या हव्यासाने ‘जनतेला ’ प्याद्यासारखी फिरवत असून ते वजीराच्या साथीने बादशाह बनू पहात आहेत. असंच रायगडच्या राजकीय कॅनव्हासवर धूसर चित्र उमटताना दिसत आहे.
मागील निवडणुकीत शेकाप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने मिळून शिवसेना-भाजपला दाराबाहेर लोटले होते. जयंत पाटील आणि सुनील तटकरे यांच्या जोडीने तेव्हा बाजी मारली होती. पण आज चित्र उलटे आहे. जयंत पाटील आणि तटकरे यांच्यातील विस्तव चक्क धगधगत्या आगीत बदलला आहे. भाजपा आणि शिंदे गट सत्तेत सामील होण्यासाठी धडपडत आहेत. भाजपाला कोणत्याही परिस्थितीत सत्तेत सामील होण्याचे स्वप्न पडले आहे, शिंदे गट फ्रंटवर लढण्यास  उत्सुक आहे. काँग्रेस अद्यापही चाचपडत असल्याचे चित्र आहे.
जिल्हा परिषदेचा मलिदा – खरा खेळ
रायगड जिल्हा परिषद म्हणजे सत्तेचा सोन्याचा कलश. दरवर्षी केंद्र आणि राज्य सरकारचा मिळून सुमारे दीडशे कोटींचा निधी इथे जमा होतो. ठेके, सत्ता, गटबाजी या मलिद्यावरच सर्वच राजकीय पक्षांची
खरी झुंज आहे. नगराध्यक्ष आणि पंचायत समित्यांतही असंच काहीसं चढ-उतार. म्हणजे सगळेच पक्ष एकमेकांवर वर्चस्व गाजवण्याच्या तयारीत आहेत.
जयंत पाटील यांचे आदेश
“गावोगावी जा, मतदारांशी संपर्क करा आणि शेकापचा झेंडा पुन्हा रोवा.” असे आदेश सरचिटणीस जयंत पाटील यांनी आपल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना अलिबाग येथे आज दिले आहेत. पाटील यांच्या डोळ्यात सत्ता पुन्हा काबीज करण्याची भूक स्पष्ट दिसते. पण या वेळी राष्ट्रवादीसोबत उभी राहील का, की शत्रूपक्षासारखी भिडेल, हे कोडं आहे.
तटकरे विरुद्ध पाटील – खरी लढाई
या निवडणुकीत विकासाचा मुद्दा दुय्यम ठरणार आहे. खरी लढाई होणार आहे ती जयंत पाटील विरुद्ध सुनील तटकरे यांच्या अहंकाराची. मतभेद इतके वाढले आहेत की एकत्र लढणं म्हणजे आता अशक्यच, असं चित्र आहे.
रायगडच्या निवडणुकीत विकास, जनतेचं भलं, शेतकऱ्यांचा प्रश्न – हे सगळं फक्त भाषणांत ऐकायला मिळणार. प्रत्यक्षात मात्र मलिदा कोणाला मिळणार, ठेके कोण गिळतो आणि खुर्चीवर कोण बसतो, यावरच सगळी झुंज होणार आहे.
पक्षीय बलाबलाचे गणित
शेकाप – 23
शिवसेना – 18
राष्ट्रवादी – 12
काँग्रेस – 3
भाजप – 3

Related Articles

Back to top button