क्रीडाताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

रायगडमध्ये महिलांची बॅट तळपणार; ‘महिला रायगड प्रीमियर लीग २०२६’ची घोषणा

आरडीसीएतर्फे मार्च-एप्रिलमध्ये विविध मैदानांवर स्पर्धा; महिला क्रिकेटपटूंना नोंदणीसाठी १५ मार्चपर्यंत मुदत


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 

अलिबाग  | 
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या (आरडीसीए) वतीने जिल्ह्यातील महिला क्रिकेटच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत ‘महिला रायगड प्रीमियर लीग २०२६’ चे आयोजन करण्यात येणार आहे. येत्या मार्च व एप्रिल महिन्यात जिल्ह्यातील विविध क्रिकेट मैदानांवर ही स्पर्धा रंगणार असल्याची घोषणा आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील व सचिव प्रदीप नाईक यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने केली.
रायगड जिल्ह्यातील महिला क्रिकेटचा दर्जा उंचावणे तसेच शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील महिला खेळाडूंना क्रिकेटकडे आकर्षित करणे आणि त्यांच्या कौशल्याला दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. जिल्ह्यातील प्रतिभावान महिला क्रिकेटपटूंना अधिकाधिक खेळाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांना पुढील स्तरावर प्रगतीची संधी मिळावी, या दृष्टीने या स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महिला खेळाडूंनी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडे अधिकृत नोंदणी करणे आवश्यक असून नोंदणीकृत खेळाडूंनाच स्पर्धेत सहभागी होता येणार असल्याचे असोसिएशनतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
महिला रायगड प्रीमियर लीग २०२६ साठी नावनोंदणीची अंतिम तारीख १५ मार्च २०२६ निश्चित करण्यात आली असून रायगड जिल्ह्यातील सर्व महिला क्रिकेटपटूंनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्पर्धेच्या नोंदणीसंदर्भात अधिक माहितीसाठी जयंत नाईक (अलिबाग), देवा पाटील (पेण), योगेश पवार (पेण), नाना मयेकर (उरण), महेंद्र भातिकरे (रोहा), आवेश चीचकर (महाड), रोहित कार्ले (खोपोली), संदीप जोशी (अलिबाग), रोहित काळे (माणगाव) आणि विनय पाटील (पनवेल-खारघर) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी आरडीसीएचे उपाध्यक्ष राजेश पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यातील जास्तीतजास्त महिला खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील व सचिव प्रदीप नाईक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.

Related Articles

Back to top button