क्रीडाताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई
रायगडमध्ये क्रिकेटचा महायज्ञ! युवा खेळाडूंची चमकदार कामगिरी अपेक्षित
रायगडमध्ये क्रिकेटचा जल्लोष! एमसीए U-19 स्पर्धेला धडाकेबाज सुरुवात

सत्यमेव जयते न्यू डॉट कॉम
रायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित १९ वर्षाखालील मुलांच्या आंतरजिल्हा इन्व्हिटेशन दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेला रायगड जिल्ह्यात उत्साहात सुरुवात झाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, गव्हाण (पनवेल) येथे युवानेते परेश शेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, उपाध्यक्ष राजेश पाटील, छत्रपती शिवाजी महाराज नगर क्रिकेट अकॅडमीचे अध्यक्ष अमित कडू, खजिनदार सुजित ठाकूर, सुमित झुंझारराव उपस्थित होते.

उद्घाटनानंतर विविध मैदानांवर तीन सामने सुरू झाले असून गव्हाण मैदानावर बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशन व दक्षिण विभाग यांच्यातील सामना रंगला आहे. नागोठणे येथील रिलायन्स क्रिकेट मैदानावर ट्रिनिटी क्रिकेट अकॅडमी विरुद्ध हिंगोली जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्यात दुसरा सामना सुरू झाला तर NISM रसायनी–पाताळगंगा मैदानावर सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशन विरुद्ध YMCA क्रिकेट क्लब यांच्यातील तिसरा सामना खेळवला जात आहे.
रायगड जिल्ह्यात लेदर बॉल क्रिकेटला नवसंजीवनी मिळत असून खेळाडूंना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे युवानेते परेश ठाकूर यांनी यावेळी सांगितले. गेल्या वर्षापासून एमसीएच्या इन्व्हिटेशन स्पर्धांचे सातत्याने आयोजन होत असल्याने युवा खेळाडूंना स्वतःचा खेळ दाखवण्याची संधी मिळत असल्याचे आरडीसीएच्यावतीने सांगण्यात आले.
स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्यातील पंच व गुणलेखक कामकाज सांभाळत असून मैदानांची गुणवत्ता, खेळपट्ट्यांचा दर्जा आणि नियोजनबद्ध आयोजन यांचे उपस्थितांनी कौतुक केले आहे. आगामी काळात विविध वयोगटांतील क्रिकेट स्पर्धांचे आयोजन रायगडमध्ये मोठ्या प्रमाणावर करण्याचा मानस असल्याचे जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.




