ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

रायगडच्या शेतकऱ्यांना प्रती गुंठा पाच हजार रुपये नुकसानभरपाई द्या — नाही, तर सरकारने शेतकऱ्यांचा “त्याग” विकला तरी म्हणा!

सामाजिक कार्यकर्ते तथा तरुण शेतकरी नेते एडवोकेट राकेश पाटील यांचा सरकार आणि प्रशासनाला संतप्त सवाल  


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम

रायगड : जिल्ह्याच्या मातीत जगणाऱ्या शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा “त्याग” शासनाने विसरला आहे का? अवकाळी पावसाने उद्ध्वस्त झालेल्या रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रती गुंठा पाच हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी तरुण शेतकरी नेते अँड. राकेश पाटील यांनी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडे केली आहे.

पाटील यांनी निवेदनात ठणकावले आहे, “मी व्यवसायाने वकील असलो, तरी आधी शेतकरी आहे!” आणि रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील शेतकरी आज अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहेत. १५ मेपासून सुरू झालेल्या अतिवृष्टीने भाताचे बीज वाहून गेले, लावणी कुजली, आणि आता पिक कापणीच्या टप्प्यावर येताच पाण्यात सडून गेले आहे.

या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरलेले नाही. तरीसुद्धा शासन “हेक्टरी” दराने नुकसानभरपाई ठरवते. जणू डोंगरदऱ्यांमध्ये गुंठ्यांवर जगणाऱ्या कोकणातील शेतकऱ्यांची थट्टा करत आहे!

“गुंठ्यांवर जगणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी भरपाई देणं म्हणजे चार आण्याचं किसमी चॉकलेट देऊन समाधान मान असं सांगण्यासारखं आहे,” असे पाटील यांनी तिखट शब्दांत म्हटले.

त्यांनी मागणी केली आहे की, जिल्ह्यातील सर्व तहसिलदार व तलाठी यांनी तातडीने पंचनामे करून प्रत्यक्ष शेती कसणाऱ्या कुळांना प्रती गुंठा पाच हजार इतकी नुकसानभरपाई द्यावी. सावकारांच्या खात्यात नव्हे, शेतकऱ्यांच्या हक्काच्या हातात ही मदत पोहोचली पाहिजे.

पाटील पुढे म्हणाले, “रायगड जिल्ह्यातील जमीनच सरकारच्या खिशात महसूल ओतते — हजारो कोटींची उलाढाल करणारे MIDC, CIDCO, JSW, सुदर्शन, GAIL, JNPT यांसारखे उद्योग इथल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर उभे आहेत. मग जेव्हा हेच शेतकरी अडचणीत आहेत, तेव्हा सरकार आणि उद्योग गप्प का?”

रायगड आणि कोकणातील शेतकरी हे महाराष्ट्रातील आदर्श शेतकरी आहेत. कर्जात गेले तरी आत्महत्या करत नाहीत, शेती सोडत नाहीत, आणि आजही जमिनीला आई मानतात. पण शासनाने जर त्यांच्याकडे पाठ फिरवली, तर या मातीतला शेतकरी केवळ कर्जबाजारी नव्हे, तर विश्वासघातग्रस्त होईल!

“रायगडचा शेतकरी सरकारचा भिकारी नाही; तो त्याचा अन्नदाता आहे. त्याला चार आण्याचा किसमी चॉकलेट नव्हे, प्रती गुंठा पाच हजार नुकसानभरपाई हक्कानेच मिळाली पाहिजे !”— एडवोकेट राकेश पाटील


Related Articles

Back to top button