रायगडच्या कृषी प्रगतीत बँक ऑफ इंडियाचा मोलाचा सहभाग — जिल्हाधिकारी किशन जावळे
किसान दिनानिमित्त अलिबागमध्ये भव्य कार्यक्रम; योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांचा गौरव

रायगड : बँक ऑफ इंडियातर्फे १९ जुलै हा दिवस ‘किसान दिवस’ म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. यानिमित्ताने रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे किसान दिन मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमांसह पार पडला. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून बँक ऑफ इंडियाच्या कृषी, महिला आणि गरीब घटकांच्या सक्षमीकरणातील भूमिकेचे कौतुक केले.
जिल्हाधिकारी जावळे म्हणाले, “बँक ऑफ इंडिया ही केवळ अग्रणी बँक म्हणूनच नव्हे, तर प्रत्यक्ष कामगिरीतही अग्रस्थानी असलेली संस्था आहे. रायगडच्या सर्वांगीण विकासात या बँकेचा मोलाचा वाटा आहे.” त्यांनी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, शासकीय योजना आणि बँक योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही केले.
कार्यक्रमात सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत मृत लाभार्थ्यांच्या वारसदारांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचे धनादेश जिल्हाधिकारी आणि बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक सुनील शर्मा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवर:
सुनील शर्मा, मुख्य महाव्यवस्थापक (CGM), एफजीएमओ, मुंबई
दीपान्विता साहनी बोस, विभागीय व्यवस्थापक, रायगड
प्रियदर्शिनी मोरे, प्रकल्प संचालक, डीआरडीए, रायगड
बिरेन चटर्जी आणि भरत सहाय, उपविभागीय व्यवस्थापक
विजय कुलकर्णी, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक, रायगड
मुख्य महाव्यवस्थापकांनी कृषी वित्तपुरवठ्यासाठी बँकेच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार करताना केंद्र व राज्य शासनाच्या योजनांमध्ये जिल्हा प्रशासनासोबत समन्वय साधण्याचे आश्वासन दिले.
विभागीय व्यवस्थापक दीपान्विता बोस यांनी बँकेच्या विविध वित्तीय विभागांतील (कृषी, एमएसएमई, रिटेल) कार्यांची माहिती दिली. प्रकल्प संचालकांनी बचत गटांसाठी बँकेच्या ८०% पेक्षा अधिक योगदानाची विशेष दखल घेतली.
कार्यक्रमात विविध योजनांच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्रे देण्यात आली. सूत्रसंचालन कृषी विभाग प्रमुख सुधीर गायकवाड यांनी केले. आभार प्रदर्शन विजय कुलकर्णी यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बँकेचे अधिकारी निलेश काळोखे, प्रतीक इचके, संदेश वरदे, मयूर वर्तक, अशोक थळे आणि विपुल राणे यांनी विशेष मेहनत घेतली.