संपादकीय

“५९ प्रभाग, पण कोणासाठी?” – रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत सत्तासूर्य कोणत्या घरात उगवणार?

"प्रभाग रचना की मतांची जुळवाजुळव?" – रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत रणधुमाळी पेटणार!


रायगड जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीने आता खऱ्या अर्थाने पेट घेतला आहे. कारण, राज्य सरकारने अचानक जाहीर केलेल्या ५९ प्रभागांच्या नव्या रचनेमुळे संपूर्ण राजकीय पट एकदम ढवळून निघालाय. ही केवळ प्रभागांची फेरबदल नाही, तर अनेकांच्या बालेकिल्ल्यांवर गदा आणणारी असल्याचे बोलले जाते.
निवडणुकीला अवघे काही महिने बाकी असताना घेतलेला हा निर्णय फक्त प्रशासकीय नसून रणनीतीचा भाग असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यामुळे जुनी समीकरणं मोडणार आणि नवी समीकरणं, नव्या युतीसह तयार होणार, हे आता निश्चित मानलं जात आहे.
मागील निवडणुकीत शेकापची ताकद, पण अध्यक्षपद राष्ट्रवादीच्या झोळीत – हा न्याय होता का?
२०१७ साली झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) २३ जागा जिंकून सर्वांत मोठा पक्ष ठरला होता. त्यांच्यानंतर शिवसेना – १८, राष्ट्रवादी काँग्रेस – १२, काँग्रेस आणि भाजप – प्रत्येकी ३ अशा जागा मिळाल्या. तरीही आश्चर्य म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा मान देण्यात आला.
ज्यांचा आकडा तिसऱ्या क्रमांकावर – त्यांना अध्यक्षपद? या राजकीय “सेटिंग” मागे कोणाची चलाखी होती? कोण झुकलं? कोण वाकलं? हे अजूनही खुलं रहस्य आहे. शेकापच्या कार्यकर्त्यांमध्ये तेव्हापासून अन्यायाची खदखद आहे, जी अजूनही संपलेली नाही.
शेकाप-राष्ट्रवादी: एकाच जिल्ह्यातले दोन ‘पावर सेंटर’, पण एकमेकांचे कट्टर विरोधक
जयंत पाटील (शेकाप) आणि सुनील तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस) — या दोन मातब्बर नेत्यांमध्ये ‘विस्तव’ नव्हे तर ‘राजकीय आगीचा फडका’ पेटलेला आहे. गेल्या काही वर्षांत ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषदेतील निर्णयप्रक्रिया – काहीही असो, या दोघांचं एकमत होणं म्हणजे चंद्रावर चालणं! आघाडीत असूनही पडद्यामागून सुरू असलेली कुरघोडी, पाडापाडी आणि गुप्त संधिविग्रह सगळ्यांनाच ठाऊक आहे.
हा संघर्ष केवळ व्यक्तिस्वार्थाचा नाही — तर पुढच्या जिल्हा परिषदेत “राजकीय वर्चस्व कुणाचे” हे ठरवणारा निर्णायक टप्पा बनणार आहे.
 नवीन रचना – नवे राजकारण?
१४ जुलै रोजी जाहीर झालेल्या नव्या रचनेनुसार रायगड जिल्ह्यातील आता एकूण ५९ प्रभाग असणार आहेत. राजपत्रात दिलेल्या माहितीनुसार गावांची नव्याने गटबांधणी करत सीमांकन केले गेले आहे.
पनवेल तालुका:
प्रभाग ५ – वावेघर, दापीवली, तुराडे
प्रभाग ६ – करंजाडे, नानोशी, मोसारे
उरण तालुका:
प्रभाग २६ – नवघर, प्रभाग २७ – जासई, प्रभाग २८ – चाणजे, प्रभाग २९ – चिरनेर
समाविष्ट गावे: चाणजे, नागावं, म्हातवली, पुनाडे, वशेणी
पेण व मुरुड तालुका:
वेळवंडे, कोंढेवाडी, आंबोळे, रेवदंडा, काटेखिंड यांसारखी गावे नव्या प्रभागांत विभागली गेली आहेत.
यामुळे काय बदलणार?
पूर्वी ज्या गावांत एकत्रित मतदान होत होते, ती गावे आता वेगवेगळ्या प्रभागांमध्ये विभागली गेली आहेत. परिणामी, शेकाप व शिवसेनेच्या पारंपरिक मतबँकांमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही रचना ‘सुवर्णसंधी’ ठरू शकते. जुने प्रस्थ नसलं, तरी नव्या गटांमधून ‘नेटवर्किंग’ करत सत्ता मिळवण्याचा इतिहास त्यांच्या गोटात आहेच.
पुढचे काही दिवस निर्णायक
राज्य सरकारने नागरिकांना २१ जुलै २०२५ पर्यंत सूचना व आक्षेप नोंदविण्याची संधी दिली आहे. त्यामुळे हा आठवडाभर सर्व पक्षांसाठी रणनीती, जोरदार बैठकांचे, आणि संभाव्य घडामोडींचे दिवस असणार आहेत.
कोणता पक्ष नव्या रचनेचा लाभ घेणार? कोणाचे गणित बिघडणार? हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
प्रभाग बदलले – आता सत्ता कुणाची?
रचनेतील बदल हे केवळ नकाशावर नाहीत – ते सत्तेच्या रेषा बदलणारे आहेत. जुने बालेकिल्ले ढासळू शकतात, तर नव्यांना संधी मिळू शकते.
पण प्रश्न एकच – या रचनेमागे ‘विकासाचा हेतू’ आहे की ‘राजकीय हिशेब’?
(सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम विश्लेषण विभाग)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button