ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगडसंपादकीय

महायुतीत ‘अर्थ’चा ट्रॅक बिघडला; रायगड जिल्हा परिषदेत आरक्षित पदांवर समझोता एक्सप्रेस धावली!


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 

आविष्कार देसाई 

अलिबाग  | 

आरक्षित पदांवर समन्वय दाखवणारी महायुती, पण अर्थ व बांधकाम सभापती पदावर येताच खरी ‘सत्तेची खेळी’ उघड झाली आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यात या महत्त्वाच्या खात्यासाठी सुरू असलेली रस्सीखेच आता उघडपणे समोर आली असून, या ‘पॉवरफुल’ खात्यावर दोन्ही पक्षांनी दावा ठोकल्याने अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींच्याच दालनात  गेला आहे.
रायगड जिल्हा परिषद विषय समिती सभापती पदाच्या निवडणुकीसाठी आज अलिबाग येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली असून पुढील सर्व निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतले जाणार आहेत.
दरम्यान, आरक्षित पदांबाबतचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. शिवसेनेच्या रसिका केणी यांनी महिला व बालविकास सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नारायण डामसे यांनी समाज कल्याण विभागाच्या सभापती पदासाठी अर्ज सादर केला आहे. ही दोन्ही पदे आरक्षित असल्याने त्यावर कोणताही मोठा वाद नसल्याचे दिसून येत आहे.
मात्र खरी चुरस ही अर्थ व बांधकाम सभापती पदावर दिसत आहे. भाजपचे वैकुंठ पाटील आणि शिवसेनेचे चंद्रकांत कळंबे यांनी अर्ज दाखल केल्याने महायुतीत अंतर्गत स्पर्धा उफाळून आली आहे. जिल्हा परिषदेचा आर्थिक कणा मानल्या जाणाऱ्या या विभागावर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन्ही पक्षांनी जोरदार लॉबिंग सुरू केल्याची चर्चा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जर अर्थ व बांधकाम सभापती पद भाजपच्या वैकुंठ पाटील यांच्याकडे गेले, तर शिवसेनेचे  चंद्रकांत कळंबे यांना शिक्षण व आरोग्य सभापती पद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र हे समीकरण बदलल्यास चित्र पूर्णपणे उलटेही होऊ शकते.
राजकीय वर्तुळात अशीही चर्चा रंगली आहे की, जिल्हा परिषदेच्या आर्थिक नियंत्रणासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले हे खाते भाजप सहजासहजी सोडणार नाही. त्यामुळे या पदावरून सुरू असलेली रस्सीखेचच आगामी सत्तावाटपाचा निर्णायक मुद्दा ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, रायगड जिल्हा परिषद सत्तास्थापनेदरम्यान घडलेल्या सत्तानाट्यानंतर शिवसेनेलाही महायुतीत सामावून घेण्यात आले होते. त्यानंतर बाहेरून सर्व काही सुरळीत असल्याचे चित्र दिसत असले तरी अंतर्गत मतभेद अद्याप कायम असल्याची चर्चा आहे. मात्र आज अर्ज दाखल करताना तिन्ही पक्ष एकत्र आल्याने समन्वयाचे चित्रही समोर आले.
विविध खातेवाटपाबाबतचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार असल्याचे अनिकेत तटकरे यांनी स्पष्ट केल्याने आता रायगड जिल्हा परिषदेतील सत्तेचे खरे चित्र पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, सध्या रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे मंगेश वाकडीकर हे विराजमान आहेत तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर पाटील यांची वर्णी लागलेली आहे.

Related Articles

Back to top button