ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
पेणमध्ये महिलेच्या खुनाचा 24 तासांत उलगडा; दोघांना अटक

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
पेण पोलिसांनी शितोळेवाडी परिसरात झालेल्या महिलेच्या खुनाचा अवघ्या 24 तासांत छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात मध्य प्रदेशमधील दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
रामअवतार ऊर्फ शेरा भाय रामविश्वास केवत (मूळ रा. मध्य प्रदेश, सध्या मुंगोशी, ता. पेण), साथीदार सुनील मोतीलाल विश्वकर्मा (रा. मध्य प्रदेश) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गालगत वनविभागाच्या जागेत एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. मृत महिलेची ओळख अंबी जाधव अशी झाली. ती काही दिवसांपूर्वी पेण येथे आली होती. अज्ञात आरोपींनी तिच्यावर हल्ला करून गळा दाबून खून केल्याचा प्राथमिक निष्कर्ष तपासात समोर आला.
घटनास्थळी मिळालेल्या मोबाईलच्या आधारे पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण केले. मोबाईल सिमधारक आणि त्याच्या संपर्कातील व्यक्तींची चौकशी करत तपास पथकाने संशयित रामअवतार ऊर्फ शेरा भाय रामविश्वास केवत (मूळ रा. मध्य प्रदेश, सध्या मुंगोशी, ता. पेण) याचा शोध घेतला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने साथीदार सुनील मोतीलाल विश्वकर्मा (रा. मध्य प्रदेश) याच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
यानंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईमुळे खुनाच्या गुन्ह्याचा अल्पावधीत उलगडा करण्यात पेण पोलिसांना यश आले आहे.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल, अपर पोलिस अधीक्षक अभिजित शिवथरे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकूल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप बागुल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.
पोलिसांनी नागरिकांना संशयास्पद हालचाली अथवा गुन्हेगारीविषयी माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.




