ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड
महाडमध्ये निवडणूक नव्हे, सत्ता युद्ध! शिवसेना-राष्ट्रवादी आमनेसामने – हाणामारीचा कहर!
रायगड जिल्ह्यातील सुनील तटकरे विरुद्ध भरत गोगावले यांच्यातील वाद चिघाळला

सत्यमेव जयते न्यू डॉट कॉम
रायगड, महाड : महाड नगरपरिषद निवडणुकीदरम्यान आज शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने येत अक्षरशः रणकंदन माजले. शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले हे थेट मतदान केंद्रात जाण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सुशांत जाबरे यांनी केला आणि त्यांना अडविताच वातावरण तापले. पाहता पाहता वादाने हिंसक वळण घेत दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची आणि हाणामारी झाली. विकास गोगावले यांनी जाबरे आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याचे बोलले जात असून घटनास्थळी गोंधळ उडाला. दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना वेगळे केले आणि परिसरात बंदोबस्त वाढवला.
या संपूर्ण प्रकारावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पोलिस प्रशासनाने कडक भूमिका घ्यावी अशी मागणी केली. निवडणुकीच्या काळात संयम राखणे आवश्यक असून कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे असेही ते म्हणाले. दुसरीकडे, “युतीमध्ये बाधा येईल असे कुठेही वागू नका” असा स्पष्ट संदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे आणि मंत्री भरत गोगावले यांना अगोदरच दिल्याची चर्चा आहे. या प्रकरणात सुरुवात कोणी केली याचा शोध घेणे आवश्यक असल्याचे शिवसेनेचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माध्यमांना सांगितले.
दरम्यान या घटनेत आणखी एक राजकीय कलाटणी म्हणजे सुशांत जाबरे हे काही दिवसांपूर्वी शिंदे गटात होते, पण त्यांनी अचानक पलटी मारत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे आजचा संघर्ष हा फक्त गैरसमज नसून, राजकीय वैमनस्याची ठिणगी असल्याचे संकेत मिळत आहेत. पुढील काही तासांत परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता असल्यामुळे पोलिसांनी मतदान केंद्र परिसरात कडेकोट सुरक्षा तैनात केली आहे, तर मंत्री भरत गोगावले स्वतः घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनाक्रमामुळे महाडमधील निवडणुकीचे वातावरण अक्षरशः युद्धभूमीत बदलले आहे.




