पदाधिकाऱ्यांच्या हाती गणेशपूजेचा मान, प्रशासनाच्या वाट्याला भजन-आरतीसाठी टाळ-मृदुंगच छान!’; रायगड जिल्हा परिषदेच्या गणेशोत्सवातील अनोखा पॅटर्न

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग |
गणपती बाप्पा मोरया! रायगड जिल्हा परिषदेत यंदा बाप्पांचे आगमन होणार असून गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. पण कार्यक्रमपत्रिका पाहिल्यावर बाप्पांपेक्षाही एक वेगळीच गोष्ट लक्ष वेधून घेतेय. गणरायाच्या पूजेचा मान पदाधिकाऱ्यांना, तर प्रशासनाच्या वाट्याला भजन-आरती! म्हणजे बाप्पांसमोर पूजा करायची ‘व्हीआयपी ड्युटी’ पदाधिकाऱ्यांची आणि टाळ-मृदुंग सांभाळायचे काम अधिकाऱ्यांचे!
रायगड जिल्हा परिषदेत गेल्या ६२ वर्षांपासून गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते. यंदा ६३वा गणेशोत्सव साजरा होणार आहे. त्यासाठी १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमपत्रिकेचा बारकाईने अभ्यास केला तर गणरायाची पूजा कुणी करायची, याचे नियोजन अगदी चोख; पण भजन-आरतीसाठी टाळ कुणी वाजवायची, याची जबाबदारीही तितकीच चोख!
अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना होणार असून त्यानंतर उपाध्यक्ष आणि विविध सभापतींच्या हस्ते रोज पूजा होणार आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांसाठी बाप्पांच्या चरणी हार, फुले, नारळ आणि पूजा असा भक्तीचा ‘व्हीआयपी पॅकेज’च तयार आहे. पदाधिकाऱ्यांनी हार-फुले घेऊन गणरायासमोर उभे राहायचे आणि प्रशासनाने टाळ-मृदुंग घेऊन भक्तिरसात रंगायचे!
प्रशासन मात्र कुठे कमी आहे? मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि विविध विभागप्रमुखांच्या उपस्थितीत भजन-आरतीचे कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. म्हणजे दिवसभर फाईलवर सही करणाऱ्या हातांना संध्याकाळी टाळही मिळणार! सकाळी ‘प्रशासन’, संध्याकाळी ‘भजन मंडळ’ असा दुहेरी रोल यंदा अधिकाऱ्यांना निभवावा लागणार आहे.
त्यामुळे जिल्हा परिषदेच्या गणेशोत्सवात एक भन्नाट समीकरण तयार झाले आहे. पदाधिकारी म्हणणार‘बाप्पांची पूजा आम्ही करतो’; अधिकारी म्हणणार ‘ठीक आहे, तुम्ही पूजा-आरती करतो आणि टाळ ही कुटतो !’ एकीकडे पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पूजा सुरू राहणार आणि दुसरीकडे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर होणार.
आता यात कर्मचाऱ्यांनाही विसरलेले नाही. २२ सप्टेंबरला राजिप व पंचायत समिती कर्मचाऱ्यांचा मनोरंजनात्मक कार्यक्रम आहे, तर २४ सप्टेंबरला कर्मचाऱ्यांचा ऑर्केस्ट्रा होणार आहे. म्हणजे पूजा पदाधिकाऱ्यांची, भजन अधिकाऱ्यांचे आणि मनोरंजन कर्मचाऱ्यांचे गणेशोत्सवात प्रत्येकाचा ‘बीट’ वेगळा!
२५ सप्टेंबरला उत्तरपूजेनंतर सायंकाळी पाच वाजता विसर्जन मिरवणूक निघणार आहे. तोपर्यंत बाप्पांच्या चरणी सगळेच एकत्र असतील. फक्त कार्यक्रमपत्रिका सांगतेय एवढेच गणरायासमोर नारळ फोडण्याची संधी पदाधिकाऱ्यांची; टाळ कुटण्याची संधी प्रशासनाची; आणि शेवटी ऑर्केस्ट्रावर थिरकण्याची संधी कर्मचाऱ्यांची!
यंदाच्या गणेशोत्सवातील हा अनोखा ‘फॉर्म्युला’ पाहता रायगड जिल्हा परिषदेत बाप्पांचे आगमन भक्तिभावाने होणार असले तरी कार्यक्रमपत्रिकेने पदाधिकारी, प्रशासन आणि कर्मचारी या तिन्ही घटकांची ‘ड्युटी’ आधीच ठरवून ठेवली आहे. आता बाप्पांनी फक्त एवढेच करावे सगळ्यांना आपापली भूमिका नीट पार पाडण्याचे बळ द्यावे!
…..




