विश्वास, प्रगती आणि सेवा : सहयोग पतसंस्थेच्या २५ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा रौप्यमहोत्सवी सोहळा

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग : सभासदांचा विश्वास, सुयोग्य कारभार आणि समाजाभिमुख भूमिका यामुळे अलिबागमधील सहयोग व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. आज रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. संस्थेची २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा हीच या प्रवासाचा ऐतिहासिक टप्पा ठरणार असून ती रविवार, १४ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजता चिंतामणराव केळकर विद्यालय, चेंढरे, अलिबाग येथे मोठ्या उत्साहात रंगणार आहे, अशी माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष योगेश मगर यांनी दिली.

गेल्या पंचवीस वर्षांत संस्थेने केवळ आर्थिक सेवा न देता समाजासाठी कार्य करण्याचा आदर्श घालून दिला आहे. सभासदांना त्वरित आणि पारदर्शक कर्जसुविधा, व्यवसायिकांना बळकटी, तसेच सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभाग याद्वारे संस्थेने आपले वेगळेपण जपले आहे.
संस्थेच्या कारभारात पारदर्शकता आणि प्रामाणिकपणाचा वारसा जपणारे पदाधिकारी व कर्मचारी यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. त्याचबरोबर सर्वसामान्य सभासदांच्या पाठिंब्यामुळेच ही २५ वर्षांची वाटचाल यशस्वी झाली, हे मान्यवरांनी अधोरेखित केले आहे.

या सभेत संस्थेच्या आजवरच्या कार्याचा आढावा घेतला जाणार असून भावी योजनांची घोषणाही होणार आहे. सभासदांना बँकिंग सेवांमध्ये नवे तंत्रज्ञान, आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या सभेकडे उत्सुकतेने पाहिले जात आहे.
रौप्यमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून विविध उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली. संस्थेच्या कार्याची कर्तृत्वकहाणी ही अलिबागच्या सहकार चळवळीला प्रेरणादायी असल्याचे मान्यवरांचे म्हणणे आहे.




