बॅडमिंटनची स्टार जोडी वेगळी! सायना-कश्यपनं घेतला विभक्त होण्याचा निर्णय
इन्स्टाग्रामवरून दिली अधिकृत माहिती

मुबंई : भारतीय बॅडमिंटनची आघाडीची खेळाडू सायना नेहवाल आणि तिचा पती पारूपल्ली कश्यप हे आता वेगळे होत असल्याची माहिती खुद्द सायनाने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे दिली आहे. दोघांचं प्रेम आणि नातं बॅडमिंटन कोर्टवर सुरू झालं, अनेक वर्षांच्या सहवासानंतर २०१८ मध्ये त्यांनी लग्न केलं. मात्र आता हे जोडपं वेगळी वाट निवडत असल्याचं स्पष्ट केलं आहे.
सायना आणि कश्यप यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच एकत्र प्रशिक्षण घेतलं. हैदराबादमधील पुलेला गोपीचंद अकादमीतच त्यांची भेट झाली आणि तिथूनच त्यांच्या प्रेमकथेची सुरुवात झाली. एकमेकांना जवळपास एक दशक डेट केल्यानंतर, त्यांनी १४ डिसेंबर २०१८ रोजी विवाह केला.
सायना नेहवालने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे –
“कधी कधी आयुष्य आपल्याला वेगळ्या वळणावर घेऊन जातं. खूप विचार करून, कश्यप आणि मी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही दोघंही स्वतःसाठी आणि एकमेकांसाठी शांती, स्थैर्य आणि यशस्वी आयुष्याची वाट निवडत आहोत. या प्रवासात मिळालेल्या आठवणींसाठी मी आभार मानते आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते.”
सध्या सायनाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर कश्यपबरोबरचा एकही फोटो दिसत नाही. याउलट कश्यपच्या अकाउंटवर अजूनही सायनासोबतचे फोटो आणि व्हिडीओ कायम आहेत, त्यामध्ये मार्चमध्ये सायनाच्या वाढदिवसाच्या पोस्टचा देखील समावेश आहे.
७ वर्षांच्या संसारानंतर सायना आणि कश्यप वेगळे होत असल्याचं जाहीर करणं अनेक चाहत्यांसाठी धक्कादायक आहे. बॅडमिंटन कोर्टवर सुरू झालेली ही प्रेमकथा आता एक नव्या वळणावर येऊन थांबली आहे.