“कार्लेखिंडला थांबा की संघर्ष वाढवा? – काँग्रेस सचिव ॲड. ठाकूर यांचा सवाल”

अलिबाग : पनवेल ते अलिबाग दरम्यान धावणाऱ्या विना थांबा एसटी गाड्यांना कार्लेखिंड येथे विशेष बाब म्हणून थांबा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव ॲड. प्रवीण मधुकर ठाकूर यांनी एसटी महामंडळाकडे केली आहे. यासाठी त्यांनी संबंधित विभागाला ईमेलद्वारे निवेदन पाठवले आहे.
आपल्या निवेदनात ॲड. ठाकूर यांनी नमूद केले की, अलिबाग तालुक्यातील कार्लेखिंड पंचक्रोशीमध्ये सुमारे 40 ते 50 गावे आहेत. पनवेलवरून अलिबागकडे येणाऱ्या विना थांबा एसटी गाड्यांना या भागातील नागरिकांच्या मागणीनुसार विशेष बाब म्हणून कार्लेखिंड येथे थांबा द्यावा, ही स्थानिकांची आग्रहाची मागणी आहे.
विना थांबा एसटी गाड्या थांबत नसल्यामुळे स्थानिक ग्रामस्थ, विद्यार्थी, कामगार, तसेच वयोवृद्ध नागरिकांना 8 ते 10 किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागतो. त्यामुळे त्यांच्या वेळेचा, पैशाचा आणि मेहनतीचा अपव्यय होतो. ही बाब लक्षात घेऊन किमान काही विना थांबा गाड्यांना कार्लेखिंड येथे थांबण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच, जेव्हा इतर नियमित गाड्या येथे थांबतात तेव्हा प्रचंड गर्दीमुळे वृद्ध नागरिक व महिला यांना चढताना अडचणी येतात. यावर उपाय म्हणून कार्लेखिंड येथे एसटीमध्ये रांगेत प्रवेश देण्यासाठी एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्याचीही मागणी ॲड. ठाकूर यांनी निवेदनात केली आहे.
या मागणीवर एसटी महामंडळ व जिल्हा प्रशासनाने सकारात्मक विचार करावा, जेणेकरून स्थानिक नागरिकांना सुरक्षित, सुलभ आणि सन्मानजनक प्रवासाची सोय मिळेल, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे.