ताज्या बातम्या
बालकांच्या विकासासाठी अंगणवाड्यांना नवे बळ, दोन दिवसीय शिबिर संपन्न

अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभाग आणि प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अंगणवाडी गुणवत्ता विकास प्रशिक्षण शिबीर अलिबाग येथे यशस्वीपणे पार पडले. ८ व ९ जुलै २०२५ रोजी घेण्यात आलेल्या या दोन दिवसीय प्रशिक्षणात अंगणवाडी सेविकांना ६ वर्षांपर्यंतच्या बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक तांत्रिक आणि भावनिक तयारीचे प्रशिक्षण देण्यात आले.
या उपक्रमाचे नियोजन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले आणि महिला व बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुचिक यांच्या संकल्पनेतून झाले.
प्रशिक्षणात ‘नवचेतना’, ‘आधारशीला’ आणि ‘माता गट सक्षमीकरण’ या तीन महत्त्वपूर्ण घटकांवर विशेष भर देण्यात आला.
० ते ३ आणि ३ ते ६ वयोगटातील मुलांच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक व भाषिक विकासासाठी योग्य पद्धती, प्रत्यक्ष प्रयोग, आणि सहभागात्मक कृतीच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले गेले. तसेच मातांचा आणि स्थानिक समाजाचा अंगणवाडी प्रक्रियेत अधिक सक्रीय सहभाग असावा यासाठी समुदाय आधारित हस्तक्षेपांवर भर देण्यात आला.
या प्रशिक्षणात जिल्ह्यातील सर्व बिटच्या पर्यवेक्षिका आणि सेविकांचा समावेश होता. या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांमार्फत उर्वरित सर्व अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे बालकांसाठी पूर्व प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम करण्याचे उद्दिष्ट बळकट होणार आहे.
८ जुलै रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी शिबिरास भेट देत सेविकांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे स्मिथिन ब्रीद, सोमराज गिरडकर, शंकर पौळ, भोजराज क्षीरसागर, तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुचिक उपस्थित होते.