बल्लाळेश्वराच्या चरणी १३ वर्षांची अखंड दिंडी परंपरा
गणेश भक्तीचा जल्लोष – ८०० हून अधिक महिलांसह मेढेखार ते पाली दिंडीचे आयोजन

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
पाली : श्रीगाव ग्रामपंचायत हद्दीतील मेढेखार गणपती उत्सव मंडळ गेली तब्बल १३ वर्षे अखंड परंपरेने मेढेखार ते पाली अशी दिंडी यात्रा आयोजित करत आहे. श्रद्धा, उत्साह आणि भक्तिभावाने सजलेल्या या यात्रेत यंदाही गावातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
यावर्षीच्या दिंडीत ८०० ते ९०० महिलांचा उत्साही सहभाग लक्षणीय ठरला. पारंपरिक पोशाख, टाळ-चिपळ्या आणि भक्तिगीतांच्या गजरात महिलांनी दिंडीचे वातावरण अधिकच मंगलमय केले.
दिंडीचे पाली येथे आगमन झाल्यानंतर सर्व भाविकांनी श्री बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले. दर्शनानंतर मंदिर परिसरात भक्तिगीते, टाळ-चिपळ्यांचा गजर आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात वातावरण भारावून गेले.
या प्रसंगी शिवसेना नेत्या मानसी दळवी, शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख राजा केणी, महिला संपर्कप्रमुख संजिवनी नाईक, कुसुंबळे ग्रामपंचायतच्या उपसरपंच रसिका केणी, युवा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय म्हात्रे, तसेच पाली नगरपालिकेचे नगरसेवक संदीप दपके यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दिंडीच्या मार्गावर पारंपरिक पद्धतीने ढोल-ताशे, टाळ-मृदंगाच्या गजरात भाविकांनी नृत्य केले. काही ठिकाणी ग्रामस्थांनी यात्रेकरूंसाठी पाणी व प्रसादाची व्यवस्था केली. या अखंड चालत आलेल्या परंपरेत भाविकांच्या उत्साहात यावर्षीही कोणतीही कमी जाणवली नाही.
मेढेखार गणपती उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दिंडीचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.