फणसाड धरणात वर्षासहलीत गेलेल्या मुंबईच्या तरुणाचा बुडून मृत्यू
अंधेरी येथून आलेल्या पर्यटक साहिल रणदिवेचा मृतदेह संध्याकाळी सापडला; स्थानिक बचावपथक व रेवदंडा पोलिसांचा शोधमोहीम राबवली

मुरुड : तालुक्यातील फणसाड धरणात वर्षा पर्यटनासाठी गेलेल्या मुंबईच्या अंधेरी येथील तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली. साहिल राजू रणदिवे (वय २४, रा. अंधेरी, मुंबई) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी येथून ११ तरुणांचा एक गट रविवारी वर्षासहलीसाठी मुरुड तालुक्यातील बोर्ली गावाजवळील फणसाड धरण परिसरात आला होता. काही वेळ परिसरात थांबल्यानंतर, समूहातील काही तरुणांनी धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले. त्याचवेळी साहिल पोहत असताना अचानक पाण्यात बुडून गेला आणि बेपत्ता झाला.
सहकाऱ्यांनी काही वेळ शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र साहिल कुठेच न सापडल्याने तात्काळ पोलिसांकडे मदतीसाठी संपर्क साधण्यात आला. घटनेची माहिती मिळताच रेवदंडा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक दीपक म्हशीलकर घटनास्थळी दाखल झाले आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली.
पोलिसांनी सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेच्या बचाव पथकाची मदत मागवली. बचावपथकाने सायंकाळच्या सुमारास पाण्यात शोध घेत साहिल रणदिवेचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर पुढील तपासासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पर्यटकांनी निसर्गस्थळी सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत स्थानिक प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.