शिवसेनेची ताकद पुन्हा दाखवणार! कुर्डूस मतदारसंघात राजा केणी यांनाच उमेदवारी; शिवसैनिकांचा ठाम निर्धार

रायगड : कुर्डूस जिल्हा परिषद मतदारसंघासाठी शिवसेनेच्या आढावा बैठकीत कार्यकर्त्यांनी एकमुखाने जिल्हाप्रमुख राजा केणी यांनाच उमेदवारी देण्याचा निर्धार केला. बैठकीत शिवसैनिकांनी हात उंचावून एकत्रित पाठिंबा दर्शवत, “कोणतंही आरक्षण असो – उमेदवार फक्त राजा केणी आणि रसिका केणीच असतील,” असं ठामपणे सांगितलं.
मधुबाग केणी फॉर्म येथे झालेल्या या बैठकीला मोठ्या संख्येने शिवसैनिकांची उपस्थिती होती.
या वेळी शिवसेना नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार रायगड जिल्ह्यात भगवा झेंडा फडकवण्यासाठी रणनीती आखण्यात आली.
शैलेश पाटील यांनी आश्वासन दिलं की – “राजा केणी जिल्हा परिषदेत निवडून आले, तर कुर्डूस मतदारसंघ ‘तिसरी मुंबई’ होईल!”
भाजपाला जागा दिल्यास असंतोष:
श्रीगाव ग्रामपंचायत सदस्य हरीचंद्र म्हात्रे यांनी स्पष्ट इशारा दिला की, “कुर्डूस भागात गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेने कार्य केलं आहे. जर ही जागा भाजपाला दिली गेली, तर शिवसैनिकांत तीव्र नाराजी उसळेल.”
त्यांनी पुढे सांगितले की, “शिवसैनिक निवडणुकीसाठी सज्ज आहेत. जागा मिळाली, तर हमखास विजय मिळवू. मात्र भाजपाला ती दिल्यास स्थानिक पातळीवर असंतोष ओसंडून वाहू शकतो.”
जिल्हा परिषदेसाठी मोर्चेबांधणी सुरू:
राजा केणी यांनी यावेळी सर्व गावांमध्ये शिवसेनेचे बोर्ड लावण्याचे आणि घराघरात संपर्क साधण्याचे आवाहन केले. “विकास कामे होणारच,” असे सांगत त्यांनी उपस्थितांना एकजूट राहण्याचा संदेश दिला.