ताज्या बातम्यामहाराष्ट्र
पेणमध्ये बेकायदेशीर गौण खनिज वाहतुकीचा रस्ता अखेर बंद; सामाजिक कार्यकर्त्याच्या तक्रारीनंतर वन विभागाची कारवाई

रायगड : पेण तालुक्यातील खारपाडा हद्दीतील मौजे घोटमाळ येथील महाराष्ट्र वनखात्याच्या हद्दीतून बेकायदेशीररित्या बनविण्यात आलेला गौण खनिज वाहतुकीचा रस्ता अखेर वन विभागाने सोमवारी (०८ जुलै) बंद केला. ही कारवाई सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या मुख्य सचिवांकडे दाखल केलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली.
दुष्मी-खारपाडा आणि खरोशी ग्रामपंचायत हद्दीतील सर्वे नंबर ८८/२३, ८८/२४, ८८/२५, ८८/२६ या वनजमिनीमधून गौण खनिज वाहतुकीसाठी बेकायदेशीरपणे रस्ता तयार करण्यात आला होता. या रस्त्यावर गेल्या सहा महिन्यांपासून दररोज ३०० ते ३५० ओव्हरलोड डंपरने अवैध वाहतूक सुरू होती. शिवाय खनिज उत्खननासाठी परवानगीशिवाय झाडांची तोडही करण्यात येत होती.
वनपरिक्षेत्र अधिकारी पेण यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याने संतोष ठाकूर यांनी २९ जून रोजी “आपले सरकार” पोर्टलवरून महाराष्ट्र राज्याचे महसूल व वन विभाग सचिवांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर वन विभागाने हालचाल करत सोमवारी मोठे चर खोदून सदर बेकायदेशीर रस्ता बंद केला.
मात्र, केवळ रस्ता बंद करून चालणार नाही, असे मत संतोष ठाकूर यांनी व्यक्त केले आहे. मागील सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या या प्रकाराकडे दुर्लक्ष करणारे वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल व वनरक्षक यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी चौकशी होणे आवश्यक असून, अन्यथा रायगड जिल्हा उप वनसंरक्षक कार्यालयासमोर उपोषण छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.