परवानाधारक असूनही सावकारीत फसवणूक — पेणमधील दोन सावकारांवर पोलिसांची धडक कारवाई

पेण : अवैध सावकारी व्यवसाय करून जनतेची फसवणूक करणाऱ्या पेण तालुक्यातील दोन सावकारांविरोधात रायगड पोलीस दलाने धडक कारवाई केली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही सावकारांकडे परवाना आहे. मात्र सदरच्या सावकारांकडून फसवणूक झाल्याच्या तक्रारी जिल्हा पोलीस दलाला प्राप्त झाल्या होत्या.
सूर्यकांत जोमा पाटील (वय 70 वर्षे), भरत सूर्यकांत पाटील (वय 35 वर्षे),
राहणार – रूम नं. 301 व 302, आमंत्रण बिल्डिंग, गोदावरीनगर, चांचपाडा, पेण अशी सावकारांची नावे आहेत.
त्यानुसार अधीक्षक आचल दलाल यांनी पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे (स्थानीय गुन्हे अन्वेषण शाखा, अलिबाग) यांना “सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग” यांच्या संपर्कात राहून तातडीने योग्य कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. या पार्श्वभूमीवर जिल्हा उपनिबंधक प्रमोद जगताप यांच्याकडे संबंधित तक्रारी पाठवण्यात आल्या.
नंतर सहाय्यक निबंधक, पेण सुभाष काळे, पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रसाद पाटील, प्रसन्ना जोशी व अन्य गुन्हे शाखा कर्मचाऱ्यांसह एक संयुक्त पथक तयार करण्यात आले. 18 जुलै रोजी पेण शहरातील पाटील कुटुंबाच्या निवासस्थानी आणि “हॉटेल रायगड गोमांतक” या ठिकाणी एकाच वेळी गोपनीयपणे छापा टाकण्यात आला.
या कारवाईदरम्यान, कर्जदारांकडून घेतलेल्या वचनपत्रांच्या मूळ प्रती, धनादेशे, तसेच अन्य संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली. संपूर्ण प्रक्रिया पंचासमक्ष पार पाडण्यात आली असून याप्रकरणी पुढील कायदेशीर तपास सहाय्यक निबंधक, पेण सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवतरे यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली.