ताज्या बातम्यामहाराष्ट्र
नैसर्गिक फुलांची बाजारपेठ वाचवण्यासाठी सरकार पावले उचलणार- फलोत्पादन मंत्री भरत गोगावले

मुबंई : राज्यातील फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कृत्रिम फुलांवर बंदी घालण्याचा विचार सुरू असून, यासंदर्भात पर्यावरण मंत्री व लोकप्रतिनिधींसोबत चर्चा करून धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, अशी माहिती फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी विधानसभेत दिली.
विधानसभा सदस्य महेश शिंदे यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली. त्यांनी सांगितले की, कृत्रिम फुलांच्या अतीव वापरामुळे नैसर्गिक फुलांची बाजारपेठ डगमगली असून, शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मंत्री गोगावले म्हणाले की, “फुलशेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, काढणीनंतरचे प्रशिक्षण आणि हरितगृह आधारित शेतीसंबंधी मार्गदर्शन शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. मात्र कृत्रिम फुलांच्या वाढत्या प्रभावामुळे नैसर्गिक फुलांची मागणी घटली आहे.”
ते पुढे म्हणाले, “अधिवेशन काळातच पर्यावरण विभागाशी बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल, जेणेकरून फुल उत्पादक शेतकऱ्यांचे संरक्षण करता येईल.”
या चर्चेत कैलास पाटील (घाडगे) आणि नारायण कुचे यांनीही सहभाग घेतला.