ताज्या बातम्यारायगड
नागावच्या मातीचा सुगंध राज्यात दरवळला – सरपंच हर्षदा मयेकर यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान
पंचायत राज विकास मंच – अखिल भारतीय सरपंच परिषदेकडून गौरव

रायगड : ग्रामविकासात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल नागाव ग्रामपंचायतीच्या सरपंच हर्षदा मयेकर यांना पंचायत राज विकास मंच – अखिल भारतीय सरपंच परिषद यांच्यातर्फे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार गावाच्या प्रगतीसाठी कार्यरत असलेल्या संपूर्ण ग्रामस्थांच्या व ग्रामपंचायत टीमच्या सामूहिक प्रयत्नांची पावती असल्याचे सरपंच हर्षदा मयेकर यांनी नमूद केले.
त्या म्हणाल्या, “हा पुरस्कार माझ्या नागाव गावातील प्रत्येक ग्रामस्थाला समर्पित आहे. तुमचं प्रेम, पाठिंबा आणि आशीर्वाद हेच माझं खऱ्या अर्थाने बळ आहे.”
या यशाचे श्रेय त्यांनी आपल्या ग्रामपंचायत टीमला, सर्व सन्माननीय सदस्यांना, ग्रामविकास अधिकारी आणि संपूर्ण कर्मचाऱ्यांना दिले. “तुमच्या सहकार्याशिवाय हे शक्य झालं नसतं,” असे त्या म्हणाल्या.

तसेच खास उल्लेख करत त्यांनी आपल्या पती निखिल मयेकऱ यांचे आभार मानले. “तुमचं आधार, समजून घेणं आणि सततचा पाठिंबा हेच माझ्या वाटचालीचे खरे शक्तिस्थान आहे,” असे त्या म्हणाल्या.
पुरस्कारासाठी निवड केल्याबद्दल अखिल भारतीय सरपंच परिषद आणि किरण भगत यांचेही त्यांनी मनःपूर्वक आभार मानले. “हा सन्मान ग्रामीण भागातील सेवा कार्यासाठीची माझी बांधिलकी अधिक दृढ करतो,” असेही त्यांनी नमूद केले.