नवी मुंबईत डिजिटल पॉवरहाऊस; महाराष्ट्रात डेटा सेंटर्स, औद्योगिक पार्क्ससाठी विक्रमी गुंतवणूक

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
मुबंई : नवी मुंबईतील ऐरोली येथे आज कॅपिटालँड डेटा सेंटरचे भव्य उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सिंगापूरचे उपपंतप्रधान गन किम योंग यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या निमित्ताने महाराष्ट्र शासन आणि कॅपिटालँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड यांच्यात 19 हजार 200 कोटींच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार झाला असून, राज्यात थेट 60 हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
यावेळी सिंगापूरचे परिवहन मंत्री जेफरी सिओ, कॅपिटालँड इंडिया ट्रस्टचे अध्यक्ष मनोहर खैतानी, मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव दासगुप्ता, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अनबलगन, कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, तसेच नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले की, या करारांतर्गत मुंबई आणि पुणे येथे बिझनेस पार्क्स, डेटा सेंटर्स, तर राज्यभरात लॉजिस्टिक्स व औद्योगिक पार्क्स उभारले जाणार आहेत. त्याचबरोबर मेपल ट्रीसोबत 3 हजार कोटींचा करारही झाला असून, त्यातून लॉजिस्टिक पार्क्स उभारले जातील.
दरम्यान, नागपूरमध्ये 350 खाटांचे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी मणिपाल हेल्थ एंटरप्रायझेस प्रा. लि. आणि टेमासेक यांच्यासोबत स्वतंत्र सामंजस्य करार झाला आहे. 700 कोटी रुपयांची ही गुंतवणूक ‘मेडिसिटी’ या महत्त्वाकांक्षी आरोग्य प्रकल्पाचा भाग असून, त्यातून 3 हजार रोजगार संधी निर्माण होणार आहेत.
सिंगापूरचे उपपंतप्रधान गन किम योंग यांनी या प्रकल्पाचे स्वागत करताना सांगितले की, भारतातील डेटा सेंटरची क्षमता 2030 पर्यंत 4.5 गिगा वॅटपर्यंत वाढण्याची शक्यता आहे आणि नवी मुंबईसारखी केंद्रे देशाच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला बळ देतील.
कॅपिटालँड इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव दासगुप्ता यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे भक्कम आर्थिक पायाभूत सुविधा आणि औद्योगिक क्षमता कॅपिटालँडसाठी मोठ्या संधी उपलब्ध करून देतात आणि राज्याच्या विकासात कंपनी सक्रिय योगदान देत राहील.