ताज्या बातम्यासंपादकीय
पूल लटकले, प्रशासन सुटलं – हीच जबाबदारीची परिभाषा?
धोकादायक पूल वर्षानुवर्षं खितपत पडले.. आणि आता 'बंदी आदेश' देऊन प्रशासन मोकळं? जनता तर प्रश्न विचारणारच ना !

फडशा
आविष्कार देसाई
रायगड : जिल्ह्यातले तब्बल ८ पूल वर्षानुवर्षं धोकादायक अवस्थेत खितपत पडलेत… आणि आता पावसाळ्यात अचानक प्रशासनाला “धोकादायक स्थिती” लक्षात आली? मग एवढ्या वर्षात पुलांची तपासणी, डागडुजी, मजबुतीकरण यासाठी काहीच केलं नव्हतं का?
सोपं आहे – अवजड वाहनांची वाहतूक थांबवा, आदेश जारी करा आणि मोकळं व्हा!
मग जनता दरवर्षी जीव मुठीत धरून या झोपलेल्या यंत्रणेची किंमत चुकवत राहणार का? सतत लटकत असलेल्या पुलांवरून जनतेचा संयमही कोसळणारच!” हे जिल्हाधिकाऱ्यांनी ध्यानात घेणे गरजेचे आहे.
असुरक्षित पूल – प्रशासनाची दुटप्पी भूमिका उघड झाली आहे का?
Vijna Consulting Engineers Pvt. Ltd. च्या स्ट्रक्चरल ऑडिटनंतर प्रशासनाच्या पायाखालची वाळू सरकली. अहवालात अलिबाग-रोहा, अलिबाग-रेवदंडा, पोयनाड-उसर-भादाणे आणि भाकरवड-देहेन या मार्गांवरील ८ पूल अत्यंत दुर्बल स्थितीत असल्याचं स्पष्ट झालं. भार क्षमता – फक्त ५ ते १६ टन!
यावर उपाययोजना शून्य, आणि थेट बंदी आदेश? ही जनता मूर्ख आहे असं प्रशासन मानतं का?
पर्यायी मार्ग… पण जबाबदारीचं काय?
पुलांवरील वाहतूक बंद करायला प्रशासन तत्पर; पण नवीन पूल उभारणं, डागडुजी करणं, निधी वापरणं – यासाठी कोणीच जबाबदार नाही का? संबंधित यंत्रणा इतका वेळ झोपली होती का याचा जाब जिल्हाधिकाऱ्यांनी विचारणे गरजेचे आहे. अन्यथा जनता जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारणारच.
2021 साली तत्कालीन पालकमंत्री अदिती तटकरे यांनी धोकादायक पुलांसाठी ४० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता.
तो निधी कुठे गेला? कोण खातं? कोण झोपलंय?
धमक्यांपेक्षा कृती हवी!
जिल्हाधिकाऱ्यांकडून “नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई” ची धमकी येतेय, पण नियम मोडून झोपलेलं प्रशासन काय उत्तर देणार?
जनतेच्या जीवावर उठलेल्या ढिसाळ कामांची जबाबदारी कोण घेणार?
………
बंदी असलेले पूल :
अ.क्र. पुलाचे नाव / क्रमांक रस्ता भार क्षमता
1 रामराज पुल (20/340) अलिबाग-रोहा रा.मा. 91 5 टन
2 स्लॅब कलवर्ट (21/680) अलिबाग-रोहा रा.मा. 91 5 टन
3 स्लॅब कलवर्ट (22/250) अलिबाग-रोहा रा.मा. 91 5 टन
4 सुडकोली पुल (26/260) अलिबाग-रोहा रा.मा. 91 5 टन
5 सुडकोली पुल (26/540) अलिबाग-रोहा रा.मा. 91 5 टन
6 सहाण पुल (2/100) अलिबाग-रेवदंडा प्र.रा.मा. 04 16 टन
7 नवेदर बेली पुल (26/900) पोयनाड-उसर-भादाणे रा.मा. 90 5 टन
8 देहेन पुल (1/100) भाकरवड-देहेन प्र.जि.मा. 29 5 टन