दहीहंडीपूर्वी अलिबाग पोलिसांचा सडेतोड इशारा – “कायद्याची गय केली जाणार नाही”
पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या नेतृत्वात काढण्यात आला रूट मार्च

अलिबाग (प्रतिनिधी) – गोपाळकाला सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना, अलिबाग शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अलिबाग पोलिसांनी सडेतोड रूट मार्च करत शक्तिप्रदर्शन केले. सायंकाळी साडेसहा वाजता हा रूट मार्च शहरातील विविध वर्दळीच्या भागातून काढण्यात आला.
या रूट मार्चचे नेतृत्व अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी केले. त्यांच्यासोबत पोलीस कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नागरिकांमध्ये विश्वास आणि सुरक्षेची भावना निर्माण करण्यासोबतच, कायदा मोडणाऱ्यांना स्पष्ट इशारा देणे, हा या रूट मार्चचा उद्देश होता.
पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी सांगितले की, “गोकुळाष्टमी आणि गोपाळकाला हे सण मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरे होतात. दहीहंडी स्पर्धांच्या निमित्ताने शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांची विशेष तयारी करण्यात आली आहे.”
“कोणी कायदा तोडण्याचा प्रयत्न केला, तर त्याची गय केली जाणार नाही,” असा ठाम संदेश या रूट मार्चद्वारे पोलिसांनी दिला आहे.
नागरिकांनीही पोलिसांच्या सज्जतेचे स्वागत करत सण शांततेत साजरा करण्याचे आवाहन केले आहे.