“दरडीने घेतला जीव, पण राजकीय दरडीत गाडली गेली नेत्यांची माणुसकी?”
"दरडीखाली जनता, प्रेताजवळ खोक्यांचा तमाशा!"

फडशा
आविष्कार देसाई
सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
रायगड : जनतेच्या दुःखाला सावरण्याऐवजी, मरणाच्या सावलीतही खोक्यांच्या आकडेमोडीत गुंतलेले नेते…! असेच चित्र मुरुडमध्ये पाहायला मिळाले. नेते भांडत बसले आहेत मात्र यातून प्रशासनाने आपली मान हळूच सोडवून घेतली आहे. हा प्रशासनाचा चाणाक्षपणा सर्वजण सोयीस्करपणे विसरले आहेत.
मुरुड तालुक्यातील मिठेखार गावात मंगळवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास दरड कोसळून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला; पण त्यापेक्षा मोठा धक्का म्हणजे घटनास्थळी जमलेल्या नेत्यांची फ्रीस्टाईल हाणामारी. जनतेच्या घरावर दरड कोसळली खरी, पण राजकारणाचा ऱ्हास मात्र अजून मोठ्या दरडीतून उघड झाला.

शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील घटनास्थळी दाखल झाल्या. त्याच वेळी शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी देखील तेथे होत्या. पाटील यांनी प्रशासनावर टीका करताना थेट “५० खोक्यांचं राजकारण” डिवचलं. एवढ्यावर मानसी दळवी व कार्यकर्ते पेटले आणि बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले.
चित्रलेखा पाटील यांनी रायगड जिल्ह्यातील तसेच अलिबाग तालुक्यातील खराब रस्त्यांचा मुद्दाही उपस्थित केला. पण दरड कोसळलेल्या ठिकाणी राजकीय हिशेब मांडून त्यांनी हे प्रकरण आपल्या गळ्यापर्यंत आणून ठेवलं.
२०२४ च्या निवडणुकीत आमदार महेंद्र दळवी यांनी चित्रलेखा पाटील यांचा पराभव केला होता. ती सल अजून मनात असल्यामुळेच खोक्यांचा मुद्दा ओढून काढला, अशी चर्चा गावात रंगली. पण प्रश्न असा आहे की – एका मृत महिलेच्या कुटुंबाला न्याय, मदत, आधार देण्याऐवजी दोन्ही नेत्यांनी आपापली राजकीय उनिधूनी काढण्यात रस दाखवला. त्यामुळे नाराजीचा सूर सर्वत्र आहे.
प्रेताशेजारी झालेली राजकीय हाणामारी ही जनतेच्या डोळ्यात झोंबणारी निर्लज्जता आहे. हे लोक जनतेचे प्रतिनिधी नसून फक्त खुर्चीसेवक आहेत, असा प्रश्न उभा राहिला आहे.
खोक्यांच्या आकड्यात गुंतलेले हे नेते जर अशा दुःखाच्या क्षणीही तमाशा मांडत असतील, तर उद्या जनतेच्या भविष्याचं खोक्यात मोजमाप करायलाही ते मागेपुढे पाहणार नाहीत. राजकारण्यांनी आता स्वतःचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. अन्यथा जनता धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही.




