क्रीडाताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

ताल, शिस्त आणि संस्कारांचा संगम; कुलाबा ढोल-ताशा पथकाने युवकांना दिली नव्या पर्वाची हाक

वाद्यपूजनाने सरावाचा श्रीगणेशा; गणेशोत्सवासाठी युवकांची जोशपूर्ण तयारी सुरू


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम 
अलिबाग
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर युवकांमध्ये शिस्त, संघभावना आणि सांस्कृतिक परंपरेचे संस्कार रुजविण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या कुलाबा ढोल-ताशा ध्वज पथक, अलिबाग यांच्या वतीने वाद्यपूजन व सराव शुभारंभ सोहळा १९ जुलै रोजी अलिबाग-रामनाथ येथील मराठी शाळेच्या मैदानावर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य सचिन राऊळ, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुनील दामले, अलिबाग नगरपालिकेचे नगरसेवक ऋषिकेश माळी, संतोष गुरव, अंकित बंगेरा यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून पथकाला शुभेच्छा दिल्या.
सोहळ्याची सुरुवात श्री गणरायाच्या चरणी नतमस्तक होत तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर कुलाबा ढोल-ताशा पथकातील वादकांसह निमंत्रित मित्र पथकांच्या वादकांनी एकत्रितपणे जोशपूर्ण ढोल-ताशा वादन सादर केले. दमदार ताल, ताशांचा घणघणाट आणि वादकांचा उत्साह यामुळे संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
यावेळी उपस्थितांनी ढोल-ताशा पथके ही केवळ गणेशोत्सवापुरती मर्यादित नसून युवकांमध्ये शिस्त, समर्पण, संघभावना आणि आपल्या संस्कृतीबद्दलचा अभिमान जागविणारे प्रभावी व्यासपीठ असल्याचे मत व्यक्त केले. पारंपरिक कला जपत नव्या पिढीला एकत्र आणण्याचे महत्त्वाचे कार्य कुलाबा ढोल-ताशा ध्वज पथक करत असल्याबद्दल पथकाचे कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमानंतर नियमित सरावाला औपचारिक सुरुवात करण्यात आली असून, यंदाच्या गणेशोत्सवात अधिक जोशपूर्ण आणि शिस्तबद्ध सादरीकरणासाठी पथकातील सदस्यांनी सज्ज असल्याचा निर्धार व्यक्त केला. उत्साह, संस्कार आणि परंपरेचा संगम ठरलेल्या या सोहळ्याने गणेशोत्सवाच्या तयारीची दमदार नांदी दिली.

Related Articles

Back to top button