तरुणांचे पाण्यासाठी पाऊलवाटेचे यज्ञ; सरला नदीची तिसरी परिक्रमा पूर्ण
अध्यात्म, पर्यावरण आणि जनजागृती एकत्र, तरुणांचा नवा पर्यटन उपक्रम

रायगड : सारळ (ता. अलिबाग) येथील आत्मविश्वास ग्रुपच्या पुढाकाराने स्थानिक ‘सरला’ नदीची तिसरी यशस्वी परिक्रमा नुकतीच पार पडली. गेली दोन वर्षे नित्यनेमाने ही परिक्रमा उन्हाळ्यात केली जात होती. मात्र यंदा पावसाळ्यात ही उपक्रमशील परिक्रमा करत तरुणांनी पर्यटन, पर्यावरण आणि अध्यात्म यांचा त्रिवेणी संगम साधला आहे.
समुद्रसंगम ते उगम आणि पुन्हा उगम ते संगम अशा मार्गाने सरला नदीची ही प्रदक्षिणा निसर्गाच्या सानिध्यात पार पडली. या यात्रेचा मार्ग निसर्गरम्य असून, कनकेश्वर डोंगर, नदीकाठची मंदिरे, म्हात्रोळी, मळा, सारळ या गाववस्त्यांना स्पर्श करतो. सरळपूलजवळ समुद्रात नदीचा संगम होतो.
सध्या नदीपात्रात चिखल, झाडाझुडपं, अडथळे असल्याने ही यात्रा अधिक कठीण होती. काही ठिकाणी पाण्यामुळे मुख्य काठाऐवजी पाऊलवाटांवरून प्रवास करावा लागला. त्यामुळे हा अनुभव नैसर्गिक अभ्यासाचाही भाग ठरला.
परिक्रमेबाबत आत्मविश्वास ग्रुपचे सचिव सुबोध राणे म्हणाले की, “या उपक्रमातून पाण्याचे महत्त्व, त्याचे संवर्धन आणि नदीस्त्रोतांची जपणूक हा मुख्य उद्देश आहे. अध्यात्म, ज्योतिष, पंचतत्वांमधील पाणी तत्वाचे महत्त्व यातून समजते. शारीरिक, मानसिक, आर्थिक अडचणींवर श्रद्धेने मात करण्याची शक्ती या प्रदक्षिणेतून मिळते.”
या वर्षी पावसाळ्यात परिक्रमा झाल्यामुळे निसर्गाचे अनोखे दर्शन झाले. परिक्रमेदरम्यान अनेकांना वैयक्तिक आणि आध्यात्मिक अनुभवही लाभल्याची भावना व्यक्त झाली. काही ठिकाणी साक्षात्कार होण्याचेही अनुभव काहींच्या सांगण्यात आले.
यंदा तिसऱ्यांदा आयोजित करण्यात आलेल्या या परिक्रमेचे पुढील नियोजन अध्यक्ष आशिष पाटील आणि कार्याध्यक्ष तुषार म्हात्रे हे करणार आहेत. यासाठी अध्यक्ष म्हणून मुंबईप्रांत संपर्क प्रमुखपदी श्री. रविंद्र पाटील यांची निवड झाली आहे.
पाण्याचे महत्त्व, नदी संवर्धन आणि पर्यावरण पर्यटनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमासाठी परिसरातील अनेकांनी या तरुणांचे कौतुक केले. तिन्ही प्रदक्षिणांमध्ये मुख जीवन रक्षक म्हणून कार्य करणाऱ्या नीलेश राणे यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.