ताज्या बातम्यारायगड
ढोल-ताशांच्या गजरात दहीहंडीच्या चषकाचे अनावरण, अलिबाग सज्ज गोविंदांच्या थरारासाठी!
53 गोविंदा पथकांची नोंदणी; लाखोंची बक्षीसे आणि स्व. नमिता नाईक स्मृती विशेष पारितोषिकांची भर

सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
रायगड : अलिबागमध्ये येत्या शनिवारी (दि.16) रंगणाऱ्या मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या दहीहंडी स्पर्धेची जय्यत तयारी सुरू झाली असून मंगळवारी (दि.12) शेकाप भवनातील सभागृहात महिला व पुरुष गोविंदा पथकांच्या भव्य चषकाचे अनावरण माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. हा सोहळा उत्साह, टाळ्यांचा कडकडाट आणि घोषणाबाजीच्या गजरात पार पडला.
शेकाप पुरस्कृत व प्रशांत नाईक मित्रमंडळ आयोजित सोहळा
शेतकरी कामगार पक्ष, पुरोगामी युवक संघटना अलिबाग पुरस्कृत आणि प्रशांत नाईक मित्रमंडळ आयोजित ही दहीहंडी स्पर्धा दुपारी ३ वाजता अलिबाग शहरात रंगणार आहे. स्पर्धेचे नियोजन युद्धपातळीवर सुरू असून शंभरहून अधिक सदस्य आणि विविध समित्या नियोजनाची जबाबदारी सांभाळत आहेत. डॉक्टर, रुग्णवाहिका यांसह वैद्यकीय सुविधा उपलब्ध ठेवण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, उत्सवाचे थेट प्रक्षेपण घरबसल्या पाहता येणार आहे.

भव्य चषकांचे अनावरण व नियोजन बैठक
सभागृहात झालेल्या बैठकीला शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, माजी नगराध्यक्ष सतिश प्रधान, शहर चिटणीस अनिल चोपडा, संदीप शिवलकर, नील नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला रिमोटद्वारे महिला व पुरुष चषकांचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर गोविंदा पथकांना अटी-शर्ती तसेच समित्यांच्या जबाबदाऱ्या स्पष्ट करण्यात आल्या.
रायगडातील गोपाळकाळा परंपरेला चालना
रायगड जिल्ह्यात श्रीकृष्णजन्माष्टमीनंतर
दुसऱ्या दिवशी गोपाळकाळा साजरा करण्याची परंपरा आहे. प्रशांत नाईक यांच्या पुढाकाराने अलिबागमध्ये ही परंपरा अनेक वर्षे जोपासली जात असून यावर्षीही थरारक दहीहंडी फोडण्याचा सोहळा पाहायला मिळणार आहे.

लाखोंची बक्षीसे गोविंदांसाठी
यंदा एकूण 53 गोविंदा पथकांची नोंदणी झाली असून त्यापैकी महिला पथक 25 आणि पुरुष पथक 28 आहेत.
पुरुष विजेते पथक: ₹1,31,111 व चषक
महिला विजेते पथक: ₹51,111 व चषक
सलामी बक्षिसे:
पुरुष – ५ थर: ₹5,000 | ६ थर: ₹11,000
महिला – ४ थर: ₹5,000 | ५ थर: ₹11,000
स्व. नमिता नाईक स्मृती विशेष पारितोषिक
अलिबाग नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा स्व. नमिता नाईक यांच्या स्मरणार्थ यावर्षी विशेष बक्षिसे जाहीर केली आहेत. अलिबाग नगरपरिषद हद्दीतील पुरुष विजेत्या पथकाला ₹1,00,000 व महिला विजेत्या पथकाला ₹50,000 अतिरिक्त देण्यात येणार आहे.
रिल्स स्पर्धेची भर
उत्सवाच्या निमित्ताने आयोजित रिल्स स्पर्धेसाठी 33 जणांनी नोंदणी केली आहे.
अलिबागकरांनो सज्ज व्हा!
शनिवारी दुपारी ३ वाजता अलिबाग शहरात दहीहंडीचा जल्लोष, गोविंदांचा थरार आणि बक्षिसांचा वर्षाव पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक हजर राहणार आहेत. घरबसल्या थेट प्रक्षेपणातूनही हा सोहळा अनुभवता येईल.