क्रीडाताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरायगड

ड्यूटीवर बस, मैदानावर बॅट–बॉल, रायगडच्या एसटी कर्मचाऱ्यांचे पोयनाडमध्ये क्रिकेट निवड शिबिर संपन्न


सत्यमेव जयते न्यूज डॉट कॉम
अलिबाग,ता, 4 :
दररोज प्रवाशांना सुरक्षित गंतव्यस्थानी पोहोचवणारे एसटीचे चालक-वाहक आणि कर्मचारी यांची क्रीडा जिद्द मंगळवारी पोयनाड येथे दिसून आली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ रायगड विभागाच्या क्रिकेट संघासाठी झुंझार युवक मंडळाच्या मैदानावर निवड चाचणी शिबिर पार पडले. सेवेत शिस्त, मैदानावर जोश, असा संगम पाहायला मिळाला.
शिबिराचे उद्घाटन रायगड विभाग नियंत्रक सुहास चौरे यांच्या हस्ते उत्साहाच्या वातावरणात झाले. बस चालवणाऱ्या हातांनीच चौकार-षटकारांची आतषबाजी करण्याचा निर्धार रायगड एसटीच्या या कर्मयोगी क्रिकेटर्सनी व्यक्त केला.
रायगड विभागातील सुमारे ४० चालक-वाहक व कर्मचारी खेळाडूंनी शिबिरात दमदार खेळाचे प्रदर्शन केले. संघ सिलेक्टर अभिषेक खातू आणि प्रितम पाटील यांनी फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण कौशल्याची चाचणी घेतली.
या निवड शिबिरातून रायगडचा क्रिकेट संघ निश्चित होणार असून निवड झालेला संघ १८ नोव्हेंबरपासून जळगाव येथे होणाऱ्या एसटी आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेत सहभागी होईल.
या वेळी कामगार अधिकारी सुहास कांबळे, विभागीय कार्यशाळेचे प्रभारक रविंद्र तांडेल, पेण कार्यालयातील लिपीक रुपेश चांदोरकर, वाहन परीक्षक दिलीप पालवणकर, झुंझार युवक मंडळाचे सचिव किशोर तावडे, क्रीडा प्रमुख नंदकिशोर चवरकर तसेच रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सदस्य ॲड. पंकज पंडित उपस्थित होते. या सर्वांनी निवड होणाऱ्या खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Back to top button